मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन – तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार हवामान विभागाने गुरुवारी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईसह ठाणे पालघर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मागील दोन – तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. बंगलाच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर दिसणार आहे. यामुळे गुरुवारी कोकणात अतिवृष्टीचा, तर मुंबईसह ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात पावसाचा जोर कायम होता. कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. गेले काही दिवस राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईत मुसळधार
मुंबईतही मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शहर, तसेच उपनगरांत बुधवारी पावसाचा जोर कायम होता. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतही संततधार पाऊस पडत होता. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत गुरुवारी अतिमुसलधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत अनेक भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमान
विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील दोन दिवस विदर्भात मुसळधार पाऊस कोसळला होता. अनेक भागात पाणी साचले होते. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली होती.
मराठवाड्यात समाधानकारक…
मराठवाड्यात जूनमध्ये पावसाची तूट होती. त्यानंतर जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात फारसा पाऊस पडलेला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील तीन – चार दिवसांत पावसाची तूट भरून निघेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.