गेले काही दिवस फक्त हजेरी लावणाऱ्या पावसाने कोकणात मंगळवारी मात्र थैमान घातले. दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईहून कोकणात जाण्याचे दोन मार्ग बंद पाडले. कोकण रेल्वेवर आरवली व संगमेश्वर या दोन स्थानकांदरम्यान रुळांवर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत या परिस्थितीत बदल झाला नव्हता. दुसऱ्या बाजुला मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या हद्दीत वरसगावजवळ पिट ढवळी नदीला आलेल्या पुराने वाहतूक बंद पडली.
मंगळवारच्या पावसाने कोकण तसेच तळकोकण या भागाला झोडपून काढले. परिणामी कोकणात संगमेश्वरजवळील शास्त्री नदी, चिपळूणजवळील पिट ढवळी नदी यांना पूर आल्याने काही पूल पाण्याखाली गेले व वाहतूक बंद पडली. यामुळे गोव्याकडे जाणारी वाहतूक बहादूर शेख नाका येथून कुंभार्ले घाटातून कोल्हापूरमार्गे गोव्याकडे वळवण्यात आली. तर मुंबईला येणारी वाहने याच मार्गाने गोव्याच्या दिशेने येतील.
कोकण रेल्वेला गेल्या दोन वर्षांमध्ये अनेकदा दरड कोसळण्याचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र तशी वेळ अद्याप आलेली नाही. पण मंगळवारच्या पावसाने संगमेश्वर व आरवली या दोन स्थानकांदरम्यान माती कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही माती बाजूला करण्याचे काम चालू होते. मात्र तंत्रज्ञांकडून ‘ट्रॅक क्लिअरन्स’ प्रमाणपत्र मिळेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार नाही, असे कोकण रेल्वेच्या वैशाली पतंगे यांनी सांगितले.