मुंबई : सोमवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झालेले असताना परळ येथील हिंदमाता परिसरही सोमवारी पाण्याखाली गेला. पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेल्या कोट्यवधीच्या उपयोजना फोल ठरल्या आहेत. परळ परिसरातील हिंदमाता भागाची पाणी तुंबण्यापासून सुटका व्हावी म्हणून पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग केला होता. २०२३ मध्ये या परिसरात पाणी तुंबले नव्हते. त्यामुळे पालिकेने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. मात्र गेली दोन वर्षे या ठिकाणी पाणी साचते आहे.
सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसात हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या इथे बंद पडत होत्या. दुकानातही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी डॉ.आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली व वाहतूक पुलावरून सुरु होती. या भागात मोठ्या प्रमाणावर शाळा असून शाळेतून सुटलेल्या मुलांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागत होते.
हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधलेली असली तरी या भूमिगत टाक्यांची क्षमता ताशी ५५ मिमी पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच असून त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर या परिसरात पाणी भरणारच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परळ पूर्वेकडील हिंदमाता हा परिसर सखल भाग असून या परिसरात थोडासा पाऊस पडला तरी हमखास पाणी साचते. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी अनेक उपाययोजना केल्या. तरीही पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हिंदमाता येथे भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्यात आला. या कामासाठी पालिकेने सुमारे २०० कोटी खर्च केले आहेत.
हिंदमाता उड्डाणपुलाखाली लघु उंदचन केंद्र बांधून हिंदमाता परिसरात साचणारे पाणी त्यात साठवून हे पाणी पंपाद्वारे वाहून नेण्यात ते प्रमोद महाजन कला पार्क येथे बांधलेल्या साठवण टाकीत साठवले जाते. तर मडके बुवा चौक येथे साचणारे पाणी पंपाद्वारे सेट झेविअर मैदानातील साठवण टाकीत साठवले जाते. त्याकरीता १२०० व १६०० मिमी व्यासाज्या पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. प्रमोद महाजन कला पार्क येथे ६ कोटी लीटर क्षमतेची साठवण टाकी तर झेविअर मैदानात ४ कोटी लीटर क्षमतेची साठवण टाकी बांधण्यात आली आहे. साठवलेले पाणी ओहोटीच्यावेळी समुद्रात सोडले जाते.
किंग्ज सर्कलही पाण्याखाली
थोडासा पाऊस पडला की लगेचच पाणी तुंबते अशा विभागामध्ये हिंदमाता पाठोपाठ किंग्ज सर्कलचा समावेश होतो. दरवर्षी पावसाळ्यात गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, षण्मुखानंद सभागृह परिसर हा भाग जलमय होतो. सोमवारच्या पावसात या भागातही खूप पाणी साचले होते. या भागातून वाहने जाताना अक्षरशः साचलेल्या पाण्यातून लाटा उसळत होत्या. या ठिकाणी ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन उभारणे,पर्जन्यवाहीन्यांचा विस्तार करणे, नव्या पर्जन्यवाहीन्या तयार करणे अशी कामे करण्यात आली आहेत. मात्र सोमवारच्या पावसाने हा खर्च देखील पाण्यात गेला आहे.