मुंबई : मुंबईत १ जून ते १६ सप्टेंबरदरम्यान एकूण ५,५७९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २,३८३.९ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३,१९५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी जून आणि जुलै महिन्यांत फारसा पाऊस पडला नाही. प्रत्येक महिन्यात दोन – तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जून, जुलै महिन्यात सरासरी पावसाची नोंद झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही साधारण परिस्थिती अशीच होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत पावसाने ओढ दिली होती.
या कालावधीत फारसा पाऊस पडला नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर २० ऑगस्टदरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे या महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली. या पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ ते ३१ ऑगस्टपर्यंत ११८३.४ मिमी पावसाची नोंद झाली.
ऑगस्ट महिन्यात सांताक्रूझ येथे ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेनंतर सुरू झालेल्या पावसामुळे ऑगस्टची सरासरी ओलांडली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली. मुंबईकरांना गेले काही दिवस असह्य उकाडा सहन करावा लागला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या सरासरीत भर घातली आहे.
१ ते १६ सप्टेंबरदरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२१.७ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३२४.७ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात कुलाबा केंद्रात ३३६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३५९.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. सध्या पावसाचा जोर लक्षात घेता. सप्टेंबर महिन्याची सरासरीही ओलांडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील पाऊस
याआधी ऑगस्ट २०२० मध्ये १२४०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. तत्पूर्वी ऑगस्ट २०१० मध्ये १०२३.३ मिमी पाऊस नोंदला गेला होता. ऑगस्ट २०२० नंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा यंदा ११८३.८ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईत मे महिन्यात सर्वाधिक
यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.