मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोसळलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडवली. अनेक सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिवसभर होते. रुळांमध्ये पाणी साचल्यामुळे उपनगरी गाड्यांचा वेगही मंदावला. परिणामी, प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला. शाळांच्या बस पाण्यात अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. मलबार हिल भागात एक संरक्षक भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी पावसाने आणखी जोर पकडला. सकाळी ११ नंतर मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, शीव, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, कुलाबा या भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ४५.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात तब्बल १२३.९ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे येथेही १०१.४ मिमी पाऊस नोंदविला गेला.
पहाटेपासून पाऊस सुरू असल्याने सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक नोकरदारांचा ‘लेटमार्क’ झाला. दुपारनंतर कार्यालयांमधून निघाल्यावरही घर गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सकाळच्या सत्रातील विद्यार्थी पावसात अडकले. बहुतेक कार्यालयांनी वाहतूक कोंडी, पावसाचा रागरंग पाहून कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली होती. तरीही खासगी वाहने घेऊन कार्यालयात निघालेले अनेकजण कोंडीत अडकले. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी चार वाजताच परतण्याची परवानगी देण्यात आली. सायंकाळी सहानंतर पावसानेही काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
एकाचा मृत्यू, एक जण बेपत्त
मलबार हिल येथील नेपियन सी रोड परिसरातील शिमला हाऊस येथे संरक्षक भिंत अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सतीश तिर्के असे यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर वांद्रे येथील कनकिया पॅलेस इमारतीजवळील बीकेसी पुलावरून मिठी नदीत उतरलेला युवक बेपत्ता आहे. वरदान जंजोतार (२४) असे त्याचे नाव आहे. अग्निशमन दलाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तीन दिवसांतील पाऊस
मुंबईत शुक्रवारपासून पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या तीन दिवसांत मिळून हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२१.४ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३०पर्यंत ८३.२ मिमी, शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० पर्यंत ५४.६ मिमी, रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत ३८.४ मिमी तर सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ४५.२ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत २४४.७ मिमी, शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० पर्यंत ८३.८ आणि रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत ९९.४ मिमी तर सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १२३.९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.