मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ठराविक काही दिवसांतच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्यादिवशीच शहरात २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला होता. त्यानंतर जून महिन्यात दोनवेळा १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर ठराविक काही दिवसांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

यंदा मुंबईत मोसमी पाऊस मे महिन्यातच दाखल झाला. ज्यादिवशी पाऊस दाखल झाला त्याचदिवशी पाऊस मुसळधार कोसळला. त्यानंतर पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर जून महिन्यात दोन वेळा १०० मिमीहून अधिक पाऊस कोसळला. तर ऑगस्ट महिन्यात शनिवारी सांताक्रूझ येथे २४ तासांत तब्बल २४४ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या काही दिवसांव्यतिरिक्त उर्वरित काळात पावसाची तीव्रता अपेक्षापेक्षा कमीच राहीली. त्यामुळे सलग मुसळधार पावसाचा अनुभव न येता, यंदा मुंबईकरांना फक्त काही ठराविक दिवशीच ‘सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे’ अशा पावसाळी स्थितींना सामोरे जावे लागले आहे. गेल्यावर्षी मात्र याच कालावधीत ( जून – ऑगस्ट) सलग अनेक दिवस मुसळधार पावसाने शहराला झोडपले होते. पावसाची ही असमान वाटचाल हवामान बदलाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाच्या एकसंधतेऐवजी ‘अचानक मुसळधार, अन्यथा कोरडे दिवस’ असे यंदाचे चित्र आहे.

ऑगस्टमध्ये किती पाऊस

ऑगस्ट महिन्यात हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ४८२.१ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १८ ऑगस्टपर्यंत कुलाबा येथे ३२२.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ५५३.६ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपर्यंत दोन्ही केंद्रावर मिळून १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून पडलेला पाऊस आणि शनिवारी २४ तासांत सांताक्रूझ येथे झालेली सर्वाधिक पावसाची नोंद यामुळे ही तूट भरून निघाली आहे. सरासरी गाठण्यासाठी आता सांताक्रूझ केंद्रात फक्त १२.८ मिमी पावसाची गरज आहे.

जुलैमध्येही सारखीच परिस्थिती

मुंबईत यंदा जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते ३१ जुलैदरम्यान कुलाबा केंद्रात ३७८.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाती नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत जुलैमधील पावसात लक्षणीय घट झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये कुलाबा केंद्रात तब्बल ३५५.७ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात ६५.१ मिमी कमी पाऊस नोंदला गेला आहे. यंदाची आकडेवारी लक्षात घेता पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.

गेल्या काही वर्षांतील आकडेवारी

गेल्या काही वर्षांत ऑगस्ट महिन्याची आकडेवारी लक्षात घेता सलग चार वर्षे पावसाला सरासरी गाठता आलेली नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी कुलाबा येथे १११.५ मिमी, तर सांताक्रूझ येथे १७७.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचबरोबर २०२४ मध्ये कुलाबा येथे २८९.३ मिमी, तर सांताक्रूझ येथे ३८२.४ मिमी पाऊस नोंदला गेला.