बुधवारी अतिवृष्टीबरोबरच सोसाटय़ाच्या वाऱ्याचा फटका दक्षिण मुंबईला बसला. वेधशाळेच्या कुलाबा केंद्रावर रात्री साडेआठपर्यंत १२ तासांत २९३ मिमी पावसाची आणि ताशी ७० किमी वेगाने वाऱ्यांची नोंद झाली. सोसाटय़ाने वाहण्याऱ्या वाऱ्यांना क्षणिक तीव्रता मिळाल्याने त्यांचा वेग ताशी १०६ किमीपर्यंत पोहचल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळी सहानंतर तीन तास मुंबई आणि महानगर परिसरास पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी झोडपून काढले. रात्री साडेआठपर्यंतच्या बारा तासात बोरिवली आणि नवी मुंबईत काही ठिकाणी मुसळधार (११५ मिमी पर्यंत) पाऊस पडला. तर ठाणे, सानपाडा, बेलापूर आणि नेरूळ आणि चेंबूर येथे अतिमुसळधार (११५ ते २०० मिमी),  तर माझगाव आणि कुलाबा येथे अतिवृष्टीची (२०० मिमीपेक्षा अधिक) नोंद झाली.

अरबी समुद्रावर दक्षिण गुजरातच्या किनारी तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) प्रणाली मंगळवारी दक्षिणेकडे सरकू लागली होती. तसेच याच पट्टय़ात द्रोणीय स्थितीदेखील तयार झाली. या दोन्ही प्रणालींची तीव्रता वाढल्याने वाऱ्यांचा वेग वाढला. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच राज्याच्या किनारपट्टीवर व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सक्रीय झालेला मान्सून यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत सांताक्रूझ, बोरिवली (पूर्व), दहिसर, भाईंदर, मीरा रोड, मुलुंड (पूर्व), ठाणे आणि अलिबाग येथे मुसळधार ते अतिमुसळधार (६५ ते २०० मिमी) पाऊस झाला.

डहाणू (३८३ मिमी) आणि रत्नागिरीस (२१६.३ मिमी) अतिवृष्टीचा फटका बसला. वेधाळेच्या कुलाबा केंद्रावर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच दरम्यान २२९.६ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

मोठे नुकसान

३ जूनला पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मुंबईतील वारा आणि बुधवारचे सोसाटय़ाचे वारा यात मूलभूत फरक आहे. चक्रीवादळादरम्यान मुंबईत ५० ते ५८ किमी ताशी वेगाचे वारे वाहीले. ‘चक्रीवादळाचे वारे हे एका सातत्याने असलेल्या वेगात वाहतात. त्यातून तीव्र झटका निर्माण होत नाही. मात्र बुधवारी किनारपट्टीवर आलेल्या वाऱ्यांना एका विविक्षित वेळी क्षणिक तीव्रता मिळते. त्यामुळे त्या झटक्याने वाऱ्यांचा वेग ताशी ७० किमीपासून १०६ किमीपर्यंत पोहचला,’ असे हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. अशा वाऱ्यांमुळे नुकसान वाढते. निसर्ग चक्रीवादळा दरम्यानच्या वाऱ्यांनी तुलनेने खूपच कमी नुकसानीचा फटका मुंबईस बसला होता. मात्र बुधवारी सायंकाळच्या वाऱ्यांमुळे खूप मोठे नुकसान झाले.

सूचना काय?

विविध सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा तातडीने व्हावा, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच मुंबई पालिके कडून सज्ज ठेवण्यात आले होते. तर अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकडय़ांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचनाही दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

४६ वर्षांतील ऑगस्टमधील सर्वाधिक पाऊस

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावरील नोंदीनुसार बुधवारी रात्री साठेआठपर्यंत झालेला २९३ मिमी पाऊस हा गेल्या ४६ वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. १९७४ ते २०१९ या काळात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस २६१.९ मिमी १९९८ साली नोंदविण्यात आला होता. त्या खालोखाल १९९० साली २५९ मिमी पाऊस झाला होता. या दोन्ही वर्षांतील या नोंदी चोवीस तासांतील आहेत. मात्र कुलाबा येथील बुधवारची २९३ मिमीची नोंद ही केवळ १२ तासातील (सकाळी साठेआठ ते रात्री साडेआठ) आहे. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in south mumbai abn
First published on: 06-08-2020 at 00:23 IST