मुंबई : सलग चौथ्या दिवशी पडलेल्या दमदार पावसाने मंगळवारीही मुंबईची गती रोखून धरली. सखल भागांत पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली तर रूळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे लोकल वाहतूक तब्बल आठ तास ठप्प होती. धोक्याच्या पातळीवर वाहणाऱ्या मिठी नदीचे पाणी काठावरील घरांमध्ये शिरल्याने ३५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यांतही अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचा सलग दुसरा दिवस ‘धारा’तीर्थी पडला.

मुंबई शहर व उपनगरांत झालेल्या दमदार पावसाने मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांनी आधीच सुट्टी जाहीर केल्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले नाहीत. मात्र, तत्पूर्वी कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांची पुन्हा घर गाठताना तारांबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेच्या यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग जलमय झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तसेच, दादर टीटी, हिंदमाता, शीव, ॲन्टॉप हिल, दक्षिण मुंबईत पायधुनी डीडी जंक्शन, काळबादेवी या भागात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. एम.जी.आर. चौक, काणेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी साचले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना ताटकळत प्रवास करावा लागला. सोमवारचा अनुभव लक्षात घेता महापालिकेने मंगळवारी शाळांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला.

सूर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा, भांडूप येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांची जवळच्या एसआरए इमारतींमध्ये तात्पुरती निवाऱ्याची, खानपानाची व्यवस्था करण्यात आली. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना पालिकेतर्फे चहा-पाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुख्य नियंत्रण कक्षात अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन आयुक्त आदींना समन्वयासाठी पाचारण करण्यात आले होते.

मंगळवारी पहाटे ४ ते दुपारी ३ या ११ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापकाच्या नोंदीनुसार इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी येथे २६८ मिमी, मरोळ अग्निशमन केंद्र येथे २६२ मिमी, पासपोली मनपा शाळा येथे २५७ मिमी, तर अंधेरी अग्निशमन केंद्र येथे २४० मिमी पावसाची नोंद झाली.

आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांना ‘२६ जुलै’ची आठवण करून दिली. त्यानंतर आता मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना बुधवारी दिवसभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पडझडीच्या ४९ घटना

मुंबईत मंगळवारी झाडे, फांद्या पडणे, घर पडणे, भिंत कोसळणे, शॉर्ट सर्किट आदी ४९ घटनांची नोंद झाली. शहर विभागात आठ, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात २९ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच एकूण १६ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या तक्रारी आल्या. शहरात नऊ, पूर्व उपनगरात चार आणि पश्चिम उपनगरातील दोन घटनांचा समावेश आहे. या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ११ या कालावधीत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला ५०० हून अधिक दूरध्वनी प्राप्त झाले.