कर्करोग व चेतासंस्थेच्या कर्करोगावरील (न्यूरो-ऑन्कोलॉजी) उपचारपद्धती, शिक्षण, संशोधन याबाबत एकमेकांना आवश्यक ते साह्य़ करण्याचे आश्वासन देत दहाव्या ‘एशियन सोसायटी फॉर न्यूरो-ऑन्कोलॉजी’च्या (अॅस्नो) दहाव्या परिषदेची रविवारी सांगता झाली.
हॉटेल ‘ताजमहल’ येथे भरविण्यात आलेल्या या तीनदिवसीय परिषदेत ‘अॅस्नो’चे अध्यक्ष डॉ. राकेश जलाली, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. सी. ई. देवपुजारी, ‘आयबीटीए’चे अध्यक्ष डेनिस स्ट्रेन्जमन यांच्यासह आशियातील विविध देशांमधून आलेले नामांकित तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेच्या शेवटच्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या देशातील कर्करोग व चेतासंस्थेच्या कर्करोगावरील उपचारपद्धती, शिक्षण, संशोधन यामध्ये येणाऱ्या अडचणी विशद केल्या. तसेच संयुक्तपणे ही लढाई लढण्याचा आणि त्यासाठी आवश्यक त्या बाबींची आदान-प्रदान करण्याचा मानस बोलून दाखविला.
भारतातील परिस्थिती विशद करताना डॉ. जलाली यांनी, झपाटय़ाने बदलणारी जीवनशैली, भाषा, राहणीमान, आर्थिक स्तर आदींमधील कमालीच्या विकेंद्रीकरणाचा आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असल्याचे सांगितले. परिणामी हीच परिस्थिती कर्करोग आणि चेतासंस्थेच्या कर्करोगावरील संशोधन, उपचार पद्धतींमध्येही अडचण बनत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय आणि आशियायी न्यूरो-ऑन्कोलॉजी संघटनांनी अशा परिषदांद्वारे उपचाराच्या नवीन पद्धती, संशोधन, शिष्यवृत्ती, तांत्रिक विकास यांच्या आदान-प्रदानाची संधी डॉक्टरांना, तज्ज्ञांना उपलब्ध करावी आणि संयुक्तपणे ही लढाई लढावी, असे आवाहन केले.
या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कर्करोग आणि चेतासंस्थेच्या कर्करोगाबाबत केले जाणारे संशोधन, उपचारपद्धती, त्याबाबतची देवाण-घेवाण याविषयीही चर्चा करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत याबाबत देशी-परदेशी संस्थांनी संयुक्तपणे कसे व काय कार्य केले आहे आणि भविष्यात काय योजना, उपक्रम राबविले जाणार आहे याचीही माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.
२१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सॅन फ्रान्सिस्को येथे भरविल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरो-ऑन्कोलॉजी’ परिषदेबाबतची आणि दिल्ली येथेही नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या ‘इंडियन कॅन्सर काँग्रेस’विषयीची ठळक वैशिष्टय़े या वेळी सांगण्यात आली.
कर्करोग आणि चेतासंस्थेच्या कर्करोगावरील उपचारासाठी काम करणाऱ्या भारतातील आघाडीच्या चार संस्थांनी प्रथमच एकत्र येऊन दिल्लीतील ही परिषद भरविली आहे, याकडेही या वेळी लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, ‘ब्रेन टय़ुमर’ झालेले १०० हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी परिषदेच्या शेवटच्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बोलक्या बाहुल्यांचा आणि जादूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाय काही रुग्णांनी कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ते त्यावरील उपचारादरम्यानचा अनुभव कथन केला.
या परिषदेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांशीही रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी संवाद साधला.