नाशिकमधील मनसेचे लोकसभा उमेदवार व नगरसेवक हेमंत गोडसे यांनी गटबाजीला कंटाळून दिलेल्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद पक्षात उमटले आहेत. पक्षबांधणीकडे नेतृत्वाचे असलेले दुर्लक्ष आणि त्यातून जागोजागी उभे राहिलेल्या ‘सखारामबापूं’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची भावना बळावली आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता मनसेच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गोडसे यांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात पुन्हा सेना-मनसेत कार्यकर्ते पळवापळवी सुरू होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांच्या करिष्म्याच्या बळावर अवघ्या सात वर्षांमध्ये मनसेचे १३ आमदार आणि दोनशे नगरसेवक निवडून आले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळाला नसला, तरी लाखोंनी मते मिळाली. या पाश्र्वभूमीवर पक्षबांधणी बळकट करून राज यांच्या करिष्म्याचा फायदा उठवणे हे पक्षातील सरचिटणीस, उपाध्यक्ष व आमदारांची जबाबदारी होती. प्रत्यक्षात बहुतेक आमदार हे केवळ आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करीत आहेत, तर काही सरचिटणीस आपल्या सवत्या सुभ्याचे नवनिर्माण करण्यात गुंग आहेत. पेशवाईत ज्याप्रमाणे सखारामबापू बोकील यांनी पेशव्यांविरोधातच कारस्थान केले त्याप्रमाणे आपल्या मर्जीतील माणसांना मोक्याच्या पदांवर बसविण्याचे उद्योग मनसेतील सखारामबापू करत असल्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्ह्य़ात विधानसभेच्या २४ जागा आहेत, तर शहरात चार जागा असतानाही मनसेच्या शहर अध्यक्षाला काम करू दिले जात नाही. त्यातच राज ठाकरे यांनी नेमलेल्या संपर्क अध्यक्षांनी शहर अध्यक्ष नीलेश चव्हाण यांना विश्वासात न घेताच पदाधिकाऱ्यांची यादी तयार केल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. नाशिक व पुणे हे मनसेसाठी बालेकिल्ले असतानाही गोडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा शेवटपर्यंत कोणालाच पत्ता लागू शकला नाही, यातच नाशिक मनसेतील सुंदोपसुंदी दिसून येते. पुण्याची सनद सरचिटणीस अनिल शिदोरे यांना दिल्यानंतरनाराजी उफाळून आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2013 रोजी प्रकाशित
मनसेतील ‘सखारामबापूं’चा पक्षाला फटका!
पक्षबांधणीकडे नेतृत्वाचे असलेले दुर्लक्ष आणि त्यातून जागोजागी उभे राहिलेल्या ‘सखारामबापूं’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची भावना बळावली आहे.
First published on: 03-06-2013 at 07:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant godse left mns will suffer in upcoming lok sabha election