कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना पत्रकार गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर अवलंबून राहण्याशिवाय विशेष तपास पथकाने काहीही केलेले नाही, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा नाराजी व्यक्त केली.
अन्य तपास यंत्रणांवर विसंबून न राहता स्वत: काही तरी प्रयत्न करा, प्रगती दाखवा, असेही न्यायालयाने पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सुनावले.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी तपासात अडथळे आले होते. ही परिस्थिती विचारात घेऊन तपास यंत्रणेवर कुठलीही कठोर टिप्पणी करणे आम्ही टाळले, असेही न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने या वेळी प्रामुख्याने स्पष्ट केले.
तपासाच्या प्रगतीबाबत तपास अधिकाऱ्याने आतापर्यंत जे काही अहवाल सादर केले आहेत त्यातून या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ने प्रयत्न केल्याचे दिसत नाही. तपासाबाबत आम्ही समाधानी नाही. परंतु पुढील सुनावणीच्या वेळी तपासाचा सर्वसमावेशक प्रगती अहवाल सादर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करत न्यायालयाने सुनावणी चार आठवडय़ांनी ठेवली.
दाभोलकर हत्येचा तपास अहवाल सादर
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’नेही तपासाचा प्रगती अहवाल सोमवारी न्यायालयात सादर केला. दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या, ते आरोपींनी ठाणे खाडीत फेकले होते. परदेशी पाणबुडय़ांच्या सहकार्याने ते पिस्तूल शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या शोधमोहिमेसाठी आणखी चार आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआयने मागितलेली चार आठवडय़ांची मुदत न्यायालयाने मान्य केली.