मुंबई : अचानक गाडी थांबवल्याच्या कारणावरून दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी आरोपी असलेल्या महिलेला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मारहाण करण्यासाठी वापरलेली चप्पल आणि हेल्मेट जप्त करण्यात आलेले नाही, असा दावा सरकारी वकिलांनी महिलेच्या जामिनाला विरोध करताना केला. मात्र, घटना घडली त्यावेळी ही महिला गर्भवती होती आणि नुकतेच तिला बाळ झाले. या कारणामुळे न्यायालयाने तिला अटकेपासून संरक्षण दिले.
या महिलेने दुचाकीस्वाराला चप्पल आणि हेल्मेटने, तर तिच्या पतीने पेव्हर ब्लॉकने मारहाण केली होती. पेव्हर ब्लॉक जप्त करण्यात आला आहे. तथापि, चप्पल आणि हेल्मेट जप्त करण्यात आलेली नाही. शिवाय, याचिकाकर्तीने केलेला गुन्हा गंभीर आहे, असा दावा करून सरकारी वकिलांनी महिलेच्या याचिकेला विरोध केला होता. तथापि, घटनेनंतर याचिकाकर्ती फरारी झाली नव्हती. तिच्यावरील आरोपांचे स्वरूप आणि ती आता २५ दिवसांच्या बाळाची आई आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे लक्षात घेता, तिला अटक करून चौकशी करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना, शर्मा याला मारहाण करण्यासाठी वापरलेली चप्पल आणि हेल्मेट जप्त करण्यासाठी याचिकाकर्तीला अटक करणे गरजेचे नाही, असे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने महिलेला अटकेपासून संरक्षण देताना प्रामुख्याने नमूद केले.
याचिकाकर्ती अनम अन्सारी आणि तिचा पती अहमद अन्सारी घटनेच्या दिवशी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी, ओमप्रकाश शर्मा हा दुचाकीस्वार अचानक त्यांच्या दुचाकीसमोर येऊन थांबला. त्यावेळी, याचिकाकर्ती आणि तिच्या पतीचा सुरूवातीला त्याच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर, दोघांनी शर्मा याला मारहाण केली. या मारहाणीमुळे नंतर शर्मा याचा मृत्यू झाला. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी याचिकाकर्ती आणि तिच्या पतीविरोधात मारहाण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच, तिच्या पतीला अटक केली. य़ाचिकाकर्ती त्यावेळी ३० आठवड्यांची गर्भवती होती. त्यामुळे, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि पतीला अटक झाल्यानंतर तिने एप्रिलमध्ये सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. याचिकाकर्तीने नुकताच बाळाला जन्म दिला आहे आणि बाळ अवघे २५ दिवसांचे आहे. त्यामुळे, तिला अटकेपासून दिलासा मिळावा अशी मागणी अनम हिच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान आरोपीने मारहाणीसाठी वापरलेली चप्पल आणि हेल्मेट जप्त करायचे आहे. त्यामुळे तिला अटक करणे आवश्यक आहे, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.