लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : बुलढाणा येथे प्रसादातून विषबाधा झालेल्या रुग्णांवर तेथील एका रुग्णालयाबाहेर उपचार केले जात असल्याच्या प्रसिध्द झालेल्या वृत्ताची उच्च न्यायालयाने शुक्रवारी गंभीर दखल घेतली. तसेच, एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली असती, त्याला तातडीच्या उपचारांची गरज असती तर काय झाले असते? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला व राज्य सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

रुग्णालय अवघ्या ३० खाटांचे असून १५० च्या आसपास व्यक्ती अस्वस्थता आणि पोटदुखीची तक्रार घेऊन आले. स्थानिक मंदिरात महाप्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना विषबाधा झाली. रुग्णालय छोटे असले तरी या रुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग आणि औषधासाठा उपलब्ध असल्याचे सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाला सांगण्याच्या प्रयत्न केला. रुग्णालय छोटे असल्याने या रुग्णांवर रुग्णालयाच्या आवारात औषधोपचार करण्यात आले. परंतु, सगळ्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आल्याचेही काकडे यांनी न्यायालयाला सांगितले.

आणखी वाचा-सध्याचे शिक्षण परवडण्यासारखे राहिलेले नाही, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे सरकारची घटनात्मक जबाबदारी

न्यायालयाने मात्र सरकारच्या या दाव्यावर बोट ठेवले. तसेच, एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली असती, त्याला तातडीच्या उपचारांची गरज असती तर काय झाले असते ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्याचवेळी, जिल्हा न्यायालय घटनास्थळापासून किती दूर आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्यावर, जिल्हा रुग्णालय शंभर किमीवर असून एखाद्या रुगणाची तब्येत बिघडली असती तर, त्याला तातडीने तिकडे हलवण्यात आले असते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयात दिलेली सगळी माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले व प्रकरणाची सुनावणी १० दिवसांनी ठेवली.

प्रकरण काय ?

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात मंगळवारी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. कार्यक्रमानंतर, महाप्रसादातून गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे ४५० ते ५०० जणांना या प्रसादातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. गावकऱ्यांवर विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court has taken cognizance of case of out of hospital treatment of poisoned patients in buldhana district mumbai print news mrj
First published on: 23-02-2024 at 23:02 IST