मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांनी विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपिलाची उच्च न्यायालयाने दखल घेतली. तसेच, खटल्यातून निर्दोष सुटका झालेल्या भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना नोटीस बजावली. न्यायालयाने यावेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देखील नोटीस बजावली.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने मृतांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनी केलेल्या अपिलाची दखल घेतली व आरोपींसह एनआयएला नोटीस बजावून प्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यांनी ठेवली.

बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांनी साध्वी प्रज्ञासिह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी निकाल देताना साध्वी प्रज्ञासिंह, प्रसाद पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी अशा सात आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती.

विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय चुकीचा आणि कायद्याला धरून नव्हता. म्हणूनच तो रद्द करावा, अशी मागणी निसार अहमद सय्यद बिलाल यांच्यासह अन्य पाच जणांनी वकील मतीन शेख यांच्यामार्फत दाखल अपिलातून केली आहे.