म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून ‘७९ अ’ नोटीस बजावण्यास सुरुवात

मुंबई : दक्षिण मुंबईतील अंदाजे १४ हजार इमारतींची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत ६६६ इमारतींची तपासणी पूर्ण झाली आहे. तर ५४० इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल मंडळाला प्राप्त झाला आहे. एका महिन्यात अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ७५ वरून थेट ९५ वर पोहोचली आहे.

अतिधोकादायक घोषित झालेल्या इमारतींना आता मंडळाने निष्कासनासह नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत ‘७९ अ’ची नोटीस बजावण्यात येत आहेत. ‘७९ अ’च्या नोटीशीनुसार मालक आणि रहिवाशांना पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रत्येकी सहा महिने देण्यात येणार आहेत. या कालावधीत मालक वा रहिवाशांनी प्रस्ताव सादर केला नाही तर मंडळ इमारतींची जागा संपादित करून पुनर्विकास मार्गी लावणार आहे.

आतापर्यंत ६६६ इमारतींची संरचनात्मक तपासणी पूर्ण

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. आजघडीला अंदाजे १४ हजार इमारती धोकादायक असून या सर्वांचाच पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र ही संख्या फारच मोठी असल्याने आणि मालक, रहिवासी पुनर्विकासासाठी पुढे येत नसल्याने अखेर या इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवीन धोरण अंमलात आणण्यात आले आहे. तर दुसरीकडे या इमारतींची संरचनात्मक तपासणी करून अतिधोकादायक इमारती शोधून त्यांचा पुनर्विकास तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील एक हजार इमारतींच्या संरचनात्मक तपासणीला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे.

मार्चमध्ये ५५७ इमारतींची तपासणी पूर्ण झाली होती आणि यापैकी ४३८ इमारतींचा अहवाल मंडळाला प्राप्त झाला होता. त्यापैकी तब्बल ७५ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. तर आता १५ एप्रिलपर्यंत संरचनात्मक तपासणी झालेल्या इमारतींची संख्या ५५७ वरून ६६६ वर गेली आहे. तर प्राप्त अहवालांची संख्या ४३८ वरून ५४० झाली आहे. त्याचवेळी अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ७५ वरून थेट ९५ वर पोहोचली आहे. ही संख्या बरीच मोठी असून येत्या काळात यात आणखी वाढ होणार असून ही वाढ मंडळांसह रहिवाशांची चिंता वाढवणारी आहे. ‘सी १’ श्रेणीत अतिधोकादायक ठरलेल्या इमारती तात्काळ रिकाम्या करून त्यांचा पुनर्विकास हाती घेणे आवश्यक असणार आहे.

४११ इमारतींची दुरुस्ती सुरू

मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७५ स्ट्रक्चरल ऑडिटरच्या माध्यमातून ६६६ इमारतींची संरचनात्मक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तर ५४० इमारतींच्या अहवालानुसार ९५ इमारती ‘सी-१’ श्रेणीत अर्थात अतिधोकादायक आढळल्या आहेत. तर ‘सी-२ ए’ श्रेणीत १३२ इमारती असून या इमारतींची तातडीने व्यापक स्वरूपात दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सी-२ ब’ श्रेणीत २७९ इमारती असून या इमारतींचीही तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ‘सी-३’ श्रेणीत ३४ इमारती असून या इमारतींची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. या अहवालानुसार मंडळाकडून एकूण ४११ इमारतींची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अतिधोकादायक इमारतींना ‘७९ अ’ नोटीस बजावून पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.