मान्सून दाखल होत असल्याने विविध भागांतून पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई खाडीलगतच्या भागात पक्षी निरीक्षकांना देशी आणि परदेशी पाहुण्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. हिमालयातील नवरंग पक्षी मुंबई विभागात दाखल आहे. याच वेळी आफ्रिकेतील चातक पक्ष्याच्या प्रतीक्षेत पक्षीप्रेमी आहेत.
मान्सूनमध्ये खाडीकिनारी चातक, नवरंग व तिबोटी धीवर (किंगफिशर प्रजातीमधील) हे पक्षी येतात. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पक्षी स्थलांतर करतात. नवरंग हिमालयातील भागातून मध्य आणि दक्षिण भारताकडे प्रवास करतो. तर तिबोटी धीवर हा दक्षिणेकडून मध्य भारताकडे स्थलांतर करतो. चातक हा थेट आफ्रिकेवरून भारतात येतो. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात तो भारतात येतो. त्यांच्या स्थलांतराचा मुख्य उद्देश हा प्रजनन असतो, असे पक्षी-अभ्यासक नंदकिशोर दुधे म्हणाले.
विणीचा काळ
तिन्ही पक्ष्यांचा सध्या विणीचा काळ आहे. त्याामुळे प्रजननासाठी घरटे तयार करण्याची पद्धत निरनिराळी आहे. तिबोटी धीवर हा भिंतीला छिद्र पाडून आपले घरटे तयार करतो. तर नवरंग हा स्वत: घरटे तयार करतो. याउलट चातक हा सातभाई नामक पक्ष्याच्या घरटय़ात अंडी घालतो. त्यामुळे सातभाई पक्ष्याचे अस्तित्व असणाऱ्या भागातच चातक आढळला जात असल्याचे पक्षी-अभ्यासक राजू कासंबे यांनी सांगितले. नवरंग पक्ष्याला डोंबिवली येथे डॉ. मनीष केरकर यांनी, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही दिवसांत निरीक्षणात टिपण्यात आले.