मुंबई : जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील सेवा अचानक बंद केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने संंबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे. मात्र रुग्णालयातील तत्कालीन अधीक्षकांनी कंपनीच्या त्रुटी वरिष्ठांना न कळविल्याने ही सेवा बंद झाल्याचे बोलले जात आहे.
ट्रॉमा रुग्णालयामध्ये सध्या २२ खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यरत होता. गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय बंद झाल्यानंतर तेथील १२ खाटा २०१९ मध्ये ट्रॉमा रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्यात आल्या होत्या. तर ट्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २०२२ मध्ये आणखी १० खाटांचा एक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. या एकूण २२ खाटांच्या दोन्ही अतिदक्षता विभागात सेवा पुरविण्याचे कंत्राट मॅक्स केअर हॉस्पिटल या कंपनीला देण्यात आले होते. मात्र या दोन्ही अतिदक्षता विभागांमध्ये सेवा पुरविण्यामध्ये कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा झाला. अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती, कोणतीही कल्पना न देता कर्तव्यावरील डॉक्टरने बाहेर जाणे, अचानक सेवा पुरवठा बंद करणे अशा अनेक बाबींचा यात समावेश होता. या गैरवर्तनाबाबत जून २०२३ मध्ये कंपनीला नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्यनंतरही सप्टेंबरमध्ये कंपनीच्या करारात वाढ करण्यात आली हाेती.
रुग्णालयाच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक त्रुटी असूनही, महानगरपालिकेने संबंधित कंपनीचा करार सप्टेंबर २०२४ मध्ये वाढवला. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये कंपनीने अतिदक्षता विभागातील सेवा अचानक बंद केली. यामुळे रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागला होता. मात्र त्यावेळी कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तात्काळ पावले उचलून दोन वरिष्ठ व तीन कनिष्ठ डॉक्टरांची ट्रॉमा केअर रुग्णालयात नियुक्ती करून १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. मात्र १२ खाटांचा अतिदक्षता विभाग अद्यापही कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे बंद असल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.