मुंबई : हिंदुस्तान अॅरॉनॉटीक्स लिमिटेल या कंपनीने टपालातून पाठवलेल्या २१ किलो वजनाच्या विमानाचा सुट्या भागाचा अपहार केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सुटया भागाची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. ते साहित्य दुबईवरून भारतात आणण्यात आले होते. तेथून गोदामात उतरवल्यानंतर ते गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड. आंध्रप्रदेश यांनी दुबईतून विमानाचे सुटे भाग आणले होते. विमानाचे सुटे भाग असलेले ३१ खोके विशाखापट्टण येथून लखनऊ येथे नेण्याचे काम एका टपाल सेवा कंपनीकडे (कुरियर कंपनी) सोपवण्यात आले होते. त्यातील एक खोका लखनऊला पोहोचला नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(३), ३१६(४), ३(५) अंतर्गत हरिओम प्रजापती, दीपक पांडे व रोहन परब अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार २०२४ नोव्हेंबरला लखनऊ येथे पाठवण्यात आलेल्या ३१ खोक्यांपैकी एक खोका मिळाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यात विमानाचा सुटा भाग होता. त्याची किंमत एक कोटी ४२ लाख रुपये होती. त्याबाबत कुरिअर कंपनीने तपासणी केली असता कोणतेही ईवे बिल नसतानाही गोदामातून हरिओम प्रजापतीने तो सुटा भाग बुकींग पार्टनरच्या वाहनात टाकला. त्यानंतर बुकींग पार्टनर रोहन परबने तो सुटा भाग कुरियर कंपनीच्या गोरेगाव येथील गोदामात उतरवला. विशेष म्हणजे बारकोड नसतानाही दीपक पांडे यांनी तो गोदामात उतरवून घेतला, असा तिघांविरोधात आरोप आहे. त्यानंतर तो विमानाचा सुटा भाग गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी अंतर्गत व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या खोक्यात विमानाशी संबंधीत स्क्रू व इतर भाग होते. गोदामातून संबंधीत खोका गहाळ झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.