करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तुलनेने कमी नुकसान, औषधोपचार पोहोचविण्यात यश, उपचार घेणाऱ्यांत वाढ

मुंबई : करोना साथीच्या काळात मुंबईतील एचआयव्ही चाचण्या आणि निदान याचे कमी झालेले प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येत असून पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे निर्दशनास आले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान टाळेबंदी लागू झाल्यानंतर मुंबईत उपचार घेणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि चाचण्या करणे आव्हानात्मक होते. परिणामी, या काळात एचआयव्हीच्या चाचण्या आणि निदानामध्ये जवळपास निम्म्याने घट झाली. त्यामुळे २०१९-२० च्या तुलनेत नव्याने निदान होणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांच्या संख्येत निम्म्याने घट झाली, परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभागाने (एमडॅक्स) केलेल्या वेगवेगळय़ा उपाययोजनांमुळे तुलनेने निदान आणि उपचार सेवा पोहचविण्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे गेल्या सात महिन्यांत एचआयव्ही निदान आणि उपचार सेवा हळूहळू पूर्वपदावर

एक लाख ९० हजार चाचण्या झाल्या असून त्यात १६५९ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. यातील ९२ टक्के रुग्णांना एन्टीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सुरू करण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत गर्भवती महिलांच्या एचआयव्ही चाचण्यांमध्येही काही प्रमाणात घट झाली. मार्च २०२१ पासून गर्भवती महिलांच्या चाचण्याही वाढल्या असून पाच महिन्यांमध्ये सुमारे ७७ हजार महिलांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १९६ महिलांना एआरटी उपचार सुरू केले आहेत.

एप्रिल २०२० मध्ये सुमारे दहा हजार रुग्णांनी औषधे घेतली नव्हती. दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल ते ऑगस्ट २०२१मध्ये उपचार न घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत अत्यंत कमी होते. या काळात ७९ टक्के रुग्णांना त्यांच्या जवळच्या केंद्रात औषधे पोहोचवण्यात आली. यातील १७ टक्के रुग्ण मुंबईबाहेर गेले असले तरी त्यांच्या गावाजवळील केंद्रामध्ये औषधे प्राप्त होतील याची सोय करण्यात आली. यासह ई-ट्रान्सफर, ई-समुपदेशन अशा उपाययोजनाही केल्या गेल्या. रुग्णांसाठी खास मदतवाहिनी क्रमांक सुरू करण्याबरोबरच रुग्णांचा पाठपुरावा संदेशाच्या माध्यमातून केला गेला. एआरटी केंद्र उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी कम्युनिटी रिफिलच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित, समुपदेशक यांच्या मदतीने औषधे दिली गेली. मुंबईबाहेरील ९४ रुग्णांना खबरदारी घेऊन स्पीड पोस्टनेही औषधे पाठविली गेली. यामुळेच या काळात रुग्णांचे उपचार थांबले नाहीत, असे एमडॅक्सच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

तरुणांमध्येच प्रमाण अधिक

२०२० ते २१ या काळात आढळलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांपैकी सुमारे ७७ टक्के रुग्ण हे १५ ते ४९ वयोगटातील असून या गटामध्येच अजून एचआयव्हीचा प्रसार होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात महिलांचे प्रमाण ३३ टक्के आहे.

९५ टक्के रुग्णांमधील एचआयव्हीची तीव्रता कमी

२०२० ते २१ मध्ये तपासण्या केलेल्या २६ हजार १३० एचआयव्ही बाधितांमधील विषाणूंच्या संख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता कमी होत असल्यामुळे यांच्यापासून संसर्ग प्रसाराचे प्रमाणही कमी होत आहे.

असुरक्षित संबंधामुळेच अधिक प्रसार

एचआयव्हीचा प्रसार होण्यामागे अद्यापही असुरक्षित लैंगिक संबंध मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहेत. गेल्यावर्षी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये सुमारे ९५ टक्के रुग्णांना असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एचआयव्हीची बाधा झाली असून देशभरात हे प्रमाण सुमारे ८६.२ टक्के आहे. याखालोखाल २.४ टक्के रुग्णांमध्ये आईमार्फत बालकाला, ०.०५ टक्के जणांमध्ये बाधित रक्तामुळे तर ०.२ टक्के रुग्णांमध्ये बाधित सुई किंवा अन्य वैद्यकीय उपकरणाच्या वापरामुळे एचआयव्हीची बाधा झाली आहे.