राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

“न्यायालयाने काय टिपणी करायची हा त्यांचा अधिकार आहे. पण पोलीस गुन्हा दाखल करत असताना सगळ्याचा अभ्यास करुनच गुन्हा दाखल करतात. न्यायालयीन निर्णय हातात आल्यानंतर त्याच्यावर मी माझे मत मांडेन. तिथली परिस्थिती काय होती आणि तिथे काय घडले या संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला याबद्दल त्यांनाच माहिती असू शकते. आम्हाला काही माहिती असण्याचे कारण नाही,” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

इतरांवर गुन्हे सिद्ध का होत नाही हा संशोधनाचा – संजय राऊत

“या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरु आहे आणि त्यामध्ये अनेक कांगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. बाकी इतरांवर ते सिद्ध का होत नाही हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत राणा दाम्पत्याने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hm dilip walse patil reaction after the court recorded the observation in the rana couple case abn
First published on: 06-05-2022 at 16:06 IST