मुंबई, पुणे : करोना विषाणू साथीच्या ग्रहणछायेने काळवंडलेला आसमंत शुक्रवारी धुळवडीच्या नाना रंगांनी न्हाऊन- माखून निघाला. करोना रुग्णसंख्या घटल्याने भीतीची काळीकभिन्न रंगछटा दूर होत असताना राज्यानेच नाही तर संपूर्ण देशाने उत्साही रंगांची उधळण केली. दोन वर्षे एका नैसर्गिक संकटाचा सामना केल्यानंतरचा हा सण अभूतपूर्व आणि अतुलनीय उत्साहात साजरा करण्यात आला.      

करोना रुग्णसंख्या घटल्यामुळे होळी आणि धूलिवंदनासाठी शासनाने निर्बंध शिथिल केले. त्यामुळे अनेकांनी  यंदा जवळची पर्यटस्थळे गाठली. होळी, धुलिवंदन आणि त्यानंतर आलेला शनिवार, रविवार यामुळे अनेकांनी सुट्टय़ांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी गर्दी केली होती.

पुण्यामध्ये उत्साह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रंगुनी रंगात साऱ्या’ असे म्हणत पुण्यात तरुणाईने उत्साहात धुळवड साजरी केली. चिमुकली मंडळीही विविध रंगांत रंगली होती.  युवकांनी दुचाकी बाहेर काढल्या आणि आपल्या मित्रांची घरे गाठली. मित्रच घरी आल्याचे म्हटल्यावर एरवी आढेवेढे घेणारेही बाहेर पडले आणि  रंगांत रंगले. रंगलेले चेहरे वडापाव आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी उपाहारगृहांमध्ये जमत होते. गप्पांचा फड रंगवीत अनेकजण मित्रमंडळींसह मोबाईलवर रंगलेल्या चेहऱ्यांच्या सेल्फी घेताना दिसत होते.