कायदेशीर बंदी असली तरी छुपी विक्री जोरात
होळी आणि धुळवडीच्या उत्साहावर मद्याची नशा चढवण्याची हौस अनेक जण भागवत असतातच; परंतु होळीच्या निमित्ताने खरी ओढ लागते ती भांगेची. सेवन करणाऱ्यावर अंमल चढवणारी भांग विकण्यास कायदेशीर बंदी असली तरी, दरवर्षी धुळवडीला भांगेची सर्रास विक्री सुरू असते. यंदादेखील हेच चित्र पाहायला मिळत असून लहान वस्त्यांपासून पंचतारांकित गृहसंकुलांपर्यंत सर्वत्र भांगेची मागणी होत आहे. भांगेचा थांग कुणालाही लागू नये, यासाठी ‘भोले बाबा की गोली’, ‘हरी गोली’ अशा टोपण नावांनी भांगेची छुपी विक्री सुरू आहे.
धुळवडीच्या निमित्ताने भांगेचे सेवन करण्याची प्रथा उत्तर प्रदेशात रूढ आहे. हिंदी चित्रपटांमध्येही होळीगीतांच्या दृश्यांमध्ये किंवा रचनांमध्ये भांगेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी भांगेच्या सेवनाचे अनेकांना आकर्षण असते. छोटय़ा वस्त्यांमध्ये हा प्रकार होतोच; पण मोठमोठय़ा गृहसंकुलांतील श्रीमंतांकडूनही या दिवशी भांगेला मागणी असते. या पाश्र्वभूमीवर मुंबईत भांगविक्रेत्यांची चोरपावले फिरू लागली आहेत. मुख्यत्वे उपनगरातील हिंदी भाषकबहुल असणाऱ्या भागांमधून भांगेचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती मिळते. हा पुरवठा द्रव्य स्वरूपात नसून पाकीटबंद भांगेच्या गोळ्यांची विक्री केली जाते. साधारण ५ इंच आकाराची हिरवी गोळी १५ ते २० रुपयांपर्यंत विकली जाते. पानटपऱ्यांवरही या गोळय़ांची छुपी विक्री सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातून काही टोळय़ा भांगेच्या गोळय़ांची पाकिटे घेऊन मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती आली आहे. ‘पानटपरीवर भांगेच्या गोळय़ा विकल्या जात असल्यास त्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळते व अशा विक्रेत्यांवर कारवाई होते. मात्र, कुणी वैयक्तिक पातळीवर विक्री करत असल्यास त्यांचा माग काढणे कठीण जाते,’ अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. अलीकडे पानटपऱ्यांवरही उघडपणे भांग विकली जात नाही. भांगेच्या गोळय़ांऐवजी ‘भोले बाबा की गोली’, ‘हरी गोली’ अशा टोपण नावांनी भांगविक्री केली जात असल्याची माहिती वडाळय़ातील एका पानविक्रेत्याने दिली.
भांगेचे प्रकार
दुधात सुका मेवा, भांगेचा पाला पाटय़ावर वाटून भांग तयार केले जाते. पाटय़ावर हे मिश्रण वाटताना जो रस तयार होतो त्यापासून कुल्फी, बर्फी, पेठे असे गोड जिन्नस खास तयार केले जातात. तर मिश्रण एकजीव करताना निर्माण होणारा चोथा मिसळून तिखट, चटपटीत पदार्थ वाटण्याची पद्धतही काही ठिकाणी आढळते. तसे भांगेचे समोसे, कचोऱ्या आणि बरेच काही. यापैकी भांग पिणे, भांगेची कुल्फी लोकप्रिय आहे. हा चोथा भांगेची गोळी म्हणून पानटपऱ्यांवर विकली जाते. ठरावीक, नेहमीच्या ग्राहकांना पानात मिसळून देण्यात येतो.
लक्षणे आणि परिणाम
- भांगेचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या स्वभावात झालेला बदल हे प्राथमिक लक्षण आहे.
- भांगेचे सेवन केलेल्या व्यक्तीला वेळेचा अंदाज बांधता येत नाही. म्हणजेच एका मिनिटाचे काम तो तासभर करत असल्याचा भास निर्माण होतो.
- स्वत:वर ताबा राहत नाही. ही लक्षणे काही तासांपुरती मर्यादित असतात. भांगेचे सेवन मोठय़ा प्रमाणात केल्यास ‘बॅड ट्रिप’ची लक्षणे दिसतात. भीती वाटणे किंवा आपल्याला काही होणार आहे, असे व्यक्तीला वाटत राहते.
- लक्षणे बळावल्यास विशिष्ट उपचार करूनच त्यांना दूर केले जाऊ शकते, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी दिली.