मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू – मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण असणारी होळी धारावीतील गौसिया मशिदीसमोर साजरी करण्यात आली. यंदाही हा होलिकोत्सव एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.होळीनिमित्त संपूर्ण देशभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे, धारावी क्षेत्रातील गौसिया मशिदीसमोरही पारंपरिक रीतीरिवाजांनुसार होलिका दहन करण्यात आले.

हा सोहळा सामंजस्य आणि बंधुत्वाचा उत्तम उदाहरण ठरला, जिथे हिंदू आणि मुस्लिम समुदायाने एकत्र येऊन हा सण साजरा केला. धारावी परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौसिया मशिदीसमोर होलिका दहन करण्यात आले, त्याला स्थानिक नागरिकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. धारावीतील मशीदीसमोर हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र येऊन होलिका दहन केले. धारावी पोलिसही वर्षभर मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या संपर्कात असतात.

धारावी कोळीवाड्यातही होळीचा उत्साह

‘मुंबईतील मुळ रहिवासी असलेल्या धारावीतील कोळी समाज होळी मोठ्या उत्साहाने साजरी करतो. वाईट प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतिक म्हणून होळीकडे पाहिले जाते. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साह असतो. होळी सजवून आसपास रांगोळी काढून, परिसर पताक्यांनी सजवला जातो. घरात गोडधोड केले जाते. होड्या सजवून त्यांची पूजा केली जाते.

कोळी महिला व पुरुष पारंपरिक वेश परिधान करून, नटूनथटून, वाजतगाजत होळी आणतात. तिची पूजा करतात. गुलाल उधळतात. नवस बोलला जातो. ऊस, नारळ, फळे, ओटी, गोडपदार्थ यांचा नैवेद्य नवविवाहित जोडपे होळीला दाखवतात. मग होळीचे दर्शन घेतले जाते. रात्रीच्या वेळी होलिकेचे दहन केले जाते. यावेळी कोळीवाड्यात मोठी गर्दी होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक जण कोळ्यांचा हा पारंपरिक सण ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. उत्सवानिमित्त येणारा मित्र परिवार, नातेवाईकांमुळे उत्साहात भर पडते. कुठे नाचगाणी, तर कुठे कोळी गाण्यांच्या ठेक्यावर महिला-पुरुष पारंपरिक नृत्य करतात. घरी आलेल्या पाहुण्यांना लाप्सी, गोडधोड खाऊ घालतात. होळी हा कोळी समाजाचा पारंपरिक सण आहे. त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे.