रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. आज(शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गृहमंत्री वळसेंनी याबाबत माहिती दिली.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असतं. त्याप्रमाणे आजची भेट ठरलेली होती आणि त्या भेटीमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे.

तसेच, सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा केलेल्या आरोपावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, “मला असं काही वाटत नाही, की त्यांच्या जीविताला धोका आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे. ती लक्षात घेता आणि त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत की, सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात यावी.”

ती घटना अनावधानाने घडलेली आहे –

काल मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यात एक कार अचानक घुसल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना गृहमंत्री वळसेंनी सांगितले की, “ती घटना अनावधानाने घडलेली घटना आहे. त्यामध्ये आम्ही संपूर्ण चौकशी केली, परंतु त्यामध्ये काही वेगळा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे फार त्या प्रकाराला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. अर्थात पोलीस यंत्रणेकडून त्या ठिकाणी जो बंदोबस्त पाहिजे होता, त्यामध्ये काही उणीव होती का हे आम्ही तपासतो आहोत. जाणीवपूर्वक काही केलं गेलेलं असेल, तर त्यात कारवाई करणे उचित राहील, अन्यथा कारवाई उचित नाही.”

राज्यसभेची परिस्थिती वेगळी होती… –

याचबरोबर, “विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष वेगवेगळी तयारी जरी करत असले तरी, राज्यसभेची परिस्थिती वेगळी होती ही वेगळी आहे. यावेळी महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील.” असा विश्वास देखील वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

“राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका, विशेषतः पवार कुटुंबाकडून…”; सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. तसेच पवार कुटुंबाकडून मला धोका असल्याचाही दावा खोत यांनी केला. सदाभाऊ खोत यांच्यावर २०१४ पासून हॉटेलचं बिल थकवल्याचा आरोप करत सोलापूरमध्ये हॉटेल मालक अशोक शिंगारे यांनी त्यांचा ताफा अडवला होता. याआरोपांवर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडताना सदाभाऊ खोत यांनी हे आरोप केले आहेत. सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला होता.