मुंबई : जालन्यातील घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे बांधव उपोषणास बसलेल्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमाराचा निषेध करण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने रविवारी दादर येथे आंदोलन केले. यापुढेही मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे पदाधिकारी वीरेंद्र पवार यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव उपोषणास बसले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईत दादर परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आला. मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलनाला सुरुवात झाली.
या मोर्चात मराठा समाजाचे तरुण, महिला तसेच लहान मुले सहभागी झाली होती. काळय़ा फिती बांधून जालन्यातील घटनेचा निषेध या वेळी करण्यात आला. घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या वेळी सरकारला बांगडय़ांचा अहेर देण्यासाठी एक महिला भगिनी सोबत बांगडय़ा घेऊन आली होती.
या आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईतील पदाधिकारी वीरेंद्र पवार, अभिजित पाटील, प्रशांत सावंत, सुवर्णा पवार यांनी केले. यापुढे गोरेगाव, कुर्ला आदी ठिकाणी आंदोलने करण्यात येतील. मराठा समाजासाठी नोकऱ्यांत आणि शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.