पुणे आणि मुंबई परिसरात घर खरेदी करू इच्छिणारे ग्राहक हे तयार सदनिकांपेक्षा, बांधकाम सुरू असणाऱ्या प्रकल्पांना पसंती देत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून ‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ द्वारे घोषित सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत घरखरोदीदारांमध्ये नेमके उलटे चित्र होते.

प्रॉपटायगरच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) या वर्षीच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एकूण २१,९८५ घरांची विक्री झाली यातील ८३ टक्के म्हणजेच १८,१९७ घरांचे बांधकाम सुरू आहे. या तीन महिन्यांत तयार सदनिका प्रकारातील एकूण विक्री ३,७८८ घरांची आहे. पुण्यातील बाजारपेठेतही या तिमाहीत विक्री झालेल्या एकूण १३,६४४ नवीन घरांपैकी ८३ टक्क्यांहून अधिक घरांचे बांधकाम अद्याप सुरू आहे.

महाराष्ट्रातील स्थावर संपदा नियामकांनी ग्राहकाभिमुख भूमिका घेत संपूर्ण राज्यात कठोर ‘रेरा’ नियम लागू केले आहेत. हीच कदाचित ग्राहकांच्या आत्मविश्वासाला बाब ठरली आहे. म्हणूनच राज्यातील घर खरेदीदारांनी बांधकाम सुरू असणाऱ्या प्रकल्पांपासून अंतर राखण्याची पूर्वी दिसणारी प्रवृत्ती आता लक्षणीय प्रमाणात टाळली जात असावी, असे प्रॉपटायगरसह हाऊसिंग डॉट कॉम तसेच मकान डॉट कॉमची मालकी असलेल्या इलारा टेक्नॉलॉजिजचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाला यांनी सांगितले.