बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’ने २ जानेवारीपासून संप पुकारला आहे. अतिदक्षता विभाग वगळता अन्य सर्व विभागांमधील सेवा बंद ठेवण्याचा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. याचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी मुंबईतील केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालय प्रशासन सज्ज झाले असून विभागप्रमुख, साहाय्यक – सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर यांची आवश्यकतेनुसार संबंधित विभागात नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सर्व रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार असून, काही रुग्णालयांतील लहान शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रियेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनांकडून सांगण्यात आले.

 हा संप सुरू झाला तर रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालये सज्ज झाली आहेत.जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकांना बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभागात सेवेवर नियुक्त केले आहे. केईएम रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग व अन्य महत्त्वाच्या विभागांची तात्पुरती जबाबदारी रुग्णालयातील साहाय्यक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर यांच्यावर सोपविण्यात आली आहे, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

शीव रुग्णालयामध्ये दररोज सात हजारांहून अधिक जण बाह्यरुग्ण विभागात येतात. तसेच आंतररुग्ण विभागातही मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे दाखल असलेल्या रुग्णांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

‘कूपर’मध्ये कमी प्रतिसाद..

‘मार्ड’कडून पुकारण्यात आलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. त्यानुसार एक-दोन विभाग वगळता कोणत्याही विभागातील निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे कूपर रुग्णालयातील कामकाजावर संपाचा फारसा परिणाम होणार नाही. संपकाळात कूपरमधील सर्व बाह्यरुग्ण, आंतररुग्ण आणि शस्त्रक्रियागार सुरू राहणार आहेत. मात्र तरीही सर्व तयारी करण्यात आली आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

सहयोगी प्राध्यापकांची मदत..

संपकाळात रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. सर्व विभागप्रमुख, साहाय्यक, सहयोगी प्राध्यापकांसोबत बैठका घेऊन आढावा घेण्यात आला आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग व अतिदक्षता विभाग सुरू राहणार असून कोणत्याही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार नाहीत, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी सांगितले.

तोडगा काढण्यासाठी..

मुंबई : विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’ने संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांनी निवासी डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र राज्य सरकार व मुंबई महाहानगरपालिका प्रशासनाकडून चर्चेसंदर्भात कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. अधिष्ठात्यांनी चर्चेदरम्यान कोणताही लिखित आश्वासन देण्यात आले नाही. परिणामी, संपावर तोडगा निघाला नाही.

महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टर सोमवारपासून संपावर जाणार आहेत. मात्र राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून चर्चेसंदर्भात कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून चर्चेसाठी बोलवण्यात आले नव्हते.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospitals ready after warning of mard strike ysh
First published on: 01-01-2023 at 00:50 IST