3 BHK flat cost in Mumbai Real Estate Market : मुंबईत घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मुंबईतील घरांच्या किमती पाहून मध्यमवर्गीय कुटुंबांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, बदलापूर आणि पनवेलकडे मोर्चा वळवला आहे. त्यातच मुंबईतील काही बांधकाम व्यावसायिक एखाद्या परिसरातील दरांपेक्षा अधिक किमतीत घरं विकत आहेत. त्यामुळे मुंबईतील घरांच्या खऱ्या किमती किती आहेत? चौरस फुटांनुसार मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कोणत्या दराने घरं विकली जात आहेत? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम आम्ही दूर करणार आहोत.
मुंबईत प्रति चौरस फूट २० हजार रुपये ते ३ लाख रुपये या दराने घरं विकली जात आहे. त्यामुळे मुंबईच्या कुठल्याही भागात (शहर व उपनगर) ३ बीएचके फ्लॅट घेण्यासठी दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.
मुंबई असो किंवा अन्य कुठलंही शहर, तिथल्या घरांच्या किमती या परिसर, प्रॉपर्टीचं वय, तिथे मिळणाऱ्या सुविधा, आसपास असणारी वस्ती यावर अवलंबून असतात. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार दहिसर, बोरीवली ते घाटकोपरसारख्या उनगरीय भागात ३ बीएचके फ्लॅटसाठी तीन ते सात कोटी रुपये मोजावे लागत आहेत. तर जुहू, वांद्रे व दक्षिण मुंबईत ३ बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी १० ते ३० कोटी रुपये मोजण्याची तयारी ठेवावू लागते. कारण या भागात ३ बीएचके फ्लॅट्स प्रीमियम जीवनशैलीची जाणीव करून देतात.
मुंबईत ३ बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी किती बजेट असायला हवं?
मुंबईत सर्वत्र एकाच भावाने घर खरेदी करता येत नाही. वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे दर आहेत. मुंबई प्रामुख्याने चार भागांमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर (उत्तर मुंबई), पूर्व उपनगर (ईशान्य मुंबई) आणि मध्य मुंबई.
उपनगरांत सर्वात स्वस्त ३ बीएचके?
दहिसर, बोरीवली, मुलुंड, कुर्ला, कांदिवली, मालाड, भांडूप, नाहूर, कांजुर मार्ग, वर्सोवा, अंधेरी, खार, जोगेश्वरी, गोरेगाव, घाटकोपर या भागांमध्ये ३ बीएचके फ्लॅट्स हे तीन ते सात कोटी रुपयांमध्ये विकले जात आहे. या भागांमध्ये २०,००० रुपये ते ७०,००० रुपये चौरस फूट या दराने घरं विकली जात आहेत. या भागांमध्ये १,००० ते १,३०० चौरस फुटांमध्ये ३ बीएचके घरं बांधली जातात.
तर, जुहू, वर्सोवा, अंधेरी, खार व वांद्र्यासारख्या उच्चभ्रू परिसरात ३ बीएचकेसाठी ५ कोटी ते १३ कोटी रुपये मोजावे लागतात. या भागांत प्रति चौरस फूट ४० हजार रुपये ते १ लाख रुपयांहून अधिक दराने घरं विकली जात आहेत.
मध्य मुंबईतील दर किती?
दादर, माहिम, माटुंगा, लोअर परळ, प्रभादेवी, लालबाग, चिंचपोकळी, महालक्ष्मी, वरळी या भागात प्रति चौरस फूट ५० हजार रुपये ते १.५ लाख रुपयांहून अधिक दराने घरं विकली जात आहेत. त्यामुळे या भागात ३ बीएचके घर खरेदी करण्यासाठी १० ते २० कोटी रुपये मोजावे लागत आहेत. दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्कजवळ ३ बीएचके घर खरेदी करण्यासाठी सात ते १२ कोटी रुपये खर्च करावे लागतात. या भागातही ३ बीएचके घरं १,००० ते १,३०० चौरस फुटांची असतात.
दक्षिण मुंबई सर्वात महागडी
दक्षिण मुंबईतील येथील ताडदेव, कुलाबा, कफ परेड, चर्नी रोड, मरीन लाइन्स, नेपियन्सी रोड भागातील जुन्या इमारतींमध्ये १० कोटी रुपयांपर्यंत ३ बीएचके फ्लॅट मिळू शकतो. परंतु, नवीन बांधकाम झालेल्या इमारतीत घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला १५ कोटींहून अधिक रुपये मोजावे लागतील. तर, मलबार हिल, पेडर रोड, नेपियन्सी रोड, अल्टमाउंटसारख्या प्राइम भागात प्रति चौरस फूट एक ते दोन लाख रुपये दराने घरं विकली जात आहे. या भागात १२०० ते १५०० चौरस फुटांचं ३ बीएचके घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला १५ ते ३० कोटी रुपये मोजावे लागतील. नाइट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सलन्सीच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.