मुंबई : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला. एचएसआरपी बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वाहन मालकांना मुदतवाढ दिली आहे.

मुदतवाढ देण्याची कारणे

  • अनेक जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसविणे बाकी आहे.
  • शहरी भागामध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात एचएसआरपी बसविण्याची नियोजित वेळ मिळाली आहे.
  • राज्यातील ग्रामीण भागात योग्यता केंद्र उघडण्यास विलंब झाला.
  • राज्यातील काही योग्यता केंद्र बंद पडली होती.
  • लोकप्रतिनिधी आणि वाहनचालकांकडून एचएसआरपी बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होती.

डिसेंबरपासून कारवाई करण्यास सुरुवात

१ एप्रिल २०२९ रोजी पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर १ डिसेंबर २०२५ पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जर ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी पुढील नियोजित वेळ मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, अशा सूचना राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिल्या आहेत.

एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयात तक्रार दाखल करता येणार आहे. वाहन धारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे ही कामे थांबविण्यात येणार आहे. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.

दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक ३ अन्वये १५.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, खालील कारणास्तव दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे:

एचएसआरपी बसवण्याची कारणे

वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची त्वरित ओळख पटविणे, वाहन क्रमांक पाटीमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी नव्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यात येत आहे. एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने केल्या. यासाठी जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता ३ संस्थाची, उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे.