मुंबई, ठाणे : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह संचारला आहे. विविध आकारांची आणि आकर्षक रंगसंगतींची मखरे, तोरणे, विद्युत रोषणाईच्या माळा, फुलमाळा, गणपतीची आभूषणे, अलंकारित वस्त्रप्रावरणे इत्यादी साहित्याने सजलेल्या मुंबई, ठाण्यातील बाजारपेठांमध्ये रविवारी मोठी गर्दी उसळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. दोन वर्षांनंतरच्या भीतीमुक्त वातावरणाची प्रचीती बाजारपेठांतील ओसंडत्या उत्साहाच्या रूपाने रविवारी आली. ‘गणेशोत्सवापूर्वीचा रविवार’ असा मुहूर्त साधत मुंबईकर आणि ठाणेकरांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये यथेच्छ भटकंती केली. अनेक गणेशभक्तांनी सहकुटुंब-सहपरिवार खरेदीचा आनंद लुटला.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, मशीद बंदर, लालबाग, परळ, दादर यांसह ठिकठिकाणच्या बाजारपेठा फुलल्या होत्या. उपनगरांतली गणेशभक्त मंडळी मध्य आणि दक्षिण मुंबईत खरेदीसाठी आली होती. ठाण्यातील जांभळी नाका, रेल्वे स्थानक परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी परिसर या मुख्य बाजारपेठांत खरेदीसाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. बाजारातील गर्दीमुळे मासुंदा तलाव तसेच गोखले मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. रविवारी सायंकाळी तर अनेक बाजारपेठांमध्ये जनसागर लोटल्याची दृश्ये पाहायला मिळाली.

निरनिराळी कृत्रिम फुलांची तोरणे, रोषणाईच्या माळा, सजावटीच्या आकर्षक वस्तूंनी उजळून निघालेल्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचा पूर आल्याचे सामायिक दृश्य होते. ठिकठिकाणच्या सराफा बाजारांमधील दुकानांमध्ये चांदीच्या दूर्वा, जास्वंदीची फुले यांसह निरनिराळे दागिने खरेदीसाठीही गणेशभक्तांची गर्दी झाली होती.

खरेदीप्रवास सुसह्य..

केवळ दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतीलच नव्हे तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील गणेशभक्तांनी खरेदीसाठी दादर गाठले होते. परिणामी, लोकल रेल्वेतही प्रचंड गर्दी होती. गणेशोत्सव लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गणेशभक्तांचा खरेदी प्रवास काहीसा सुसह्य झाला.

भक्तांमध्ये उत्साह, व्यापाऱ्यांत आनंद

दोन वर्षांपासूनची करोना भीतीची छाया दूर झाल्यानंतरचा गणेशोत्सव असल्याने यंदा बाजारात उत्साहाचे रंग-तरंग उमटताना दिसत आहेत. गणेशभक्तांमध्ये ओसंडणारा उत्साह, तर व्यापाऱ्यांमध्ये असीम आनंदाचे वातावरण आहे.

यंदा नवे काय?

यंदा गणेशोत्सवानिमित्त बाजारांत नवनव्या प्रकारची मखरे आहेत. त्यांत पुठ्ठय़ांपासून तयार केलेली, पुठ्ठा आणि लेझर लाइटचा वापर करून तयार केलेली आणि बांबूपासून बनवलेल्या मखरांचा समावेश आहे. या पर्यावरणस्नेही मखरांच्या खरेदीकडे गणेशभक्तांचा कल आहे.

मोकळय़ा वातावरणात..

मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टाळेबंदी लागू झाली. करोनाची पहिली लाट ओसरली. दुसरी, तिसरी लाट आली. टाळेबंदी हळूहळू उठवली गेली, निर्बंध मात्र जारी राहिले. त्यामुळे २०२० आणि २०२१ मध्ये कठोर निर्बंधांचे पालन करीत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. यंदा भीतीमुक्त, मोकळय़ा वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे.

लगबग.. घरीदारी, मंडपी

निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. घरच्या गणपतींच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत असल्याने त्यात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून हा रविवार सार्थकी लावण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge crowd in mumbai thane market for ganeshotsav shopping zws
First published on: 29-08-2022 at 04:20 IST