मुंबई : रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करणे, वाहनांची तांत्रिक योग्यता तपासणी, उत्सर्जन मानकांची पूर्तता होते का हे तपासणे, अपघातांची चौकशी करणे आणि संबंधित नियमांची अंमलबजावणी करणे, ही कामे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची असतात. परंतु, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची शेकडो पदे रिक्त असल्याने त्यांच्या कामाचा भार इतरांवर पडला आहे.
नुकताच परिवहन विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ कर्मचाऱ्यांची मोटार वाहन निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. परिवहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावरून मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा पदचिन्ह सन्मान सोहळा नुकताच झाला. परंतु, एकाचवेळी पदोन्नती झाल्याने, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची शेकडो पदे रिक्त झाली. त्यामुळे परिवहन विभागाचे कामकाज रखडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर मोटार वाहन निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्यामुळे रिक्त झालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे लवकर भरती करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाद्वारे देण्यात आली.
९५ टक्के पदे भरली
मोटार वाहन विभागात तांत्रिक कामांमध्ये जनतेचे कामे सुलभपणे करण्यासाठी नवीन पदोन्नत झालेल्या मोटार वाहन निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जवळजवळ ९५ टक्के मोटार वाहन निरीक्षक पदाच्या जागा भरण्यात आली आहे. तांत्रिक कामासाठी नवीन मोटार वाहन निरीक्षक यांचा विभागाला मोठा फायदा होईल. जनतेचे काम अतिशय जलदगतीने करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक जबाबदारी घेतील, असा विश्वास आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या आकडेवारीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. रिक्त झालेल्या पदांमुळे कामात संथपणा, दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाची प्रमुख कामे
– वाहनांची तपासणी करणे
– खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या वाहनांची रस्त्यावर वापरण्यासाठी योग्यता तपासणे. त्यात वाहनांची तांत्रिक तपासणी करणे, नुकसान झाले आहे का हे पाहणे आणि ते सुरक्षित आहेत याची खात्री करणे या बाबींचा समावेश असतो.
– प्रदूषण मानकांची पडताळणी करणे
– शासनाने ठरवून दिलेल्या उत्सर्जन मानकांची पूर्तता वाहने करतात की नाही याची तपासणी करणे.अपघातांची चौकशी करणे
– वाहनांशी संबंधित झालेल्या अपघातांची चौकशी करणे आणि त्यासंबंधी तपशीलवार अहवाल तयार करणे.
– सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे
– रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन केले जात असल्याची खात्री करण्यासाठी ते कार्य करतात.
– नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे
– वाहनांची नोंदणी, वापर आणि देखभालीशी संबंधित मोटार वाहन कायदा, १९८८ आणि इतर नियमांची अंमलबजावणी करणे. वाहने सर्व नियमांचे पालन करत आहेत हे सुनिश्चित करणे.