मुंबई : दोन दिवसांमध्ये सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ३३ किलो हायड्रो गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ३३ कोटी रुपये आहे. वेगवेगळ्या सहा कारवायांमध्ये एकूण ८ जणांना अटक करण्यात आली. त्यात सात प्रवासी आणि विमानतळाबाहेर अमली पदार्थ घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. बॅंकॉक आणि मलेशियामधून हा हायड्रो गांजा भारतात तस्करी करून आणण्यात येत होता.
सध्या हायड्रोपोनिक गांजा अर्थात हायड्रो गांजाची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या हायड्रो गांजाची तस्करी होऊ लागली आहे. त्यामुळे विमानतळावर सीमाशुल्क विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवार आणि बुधवारी वेगवेगळ्या सहा प्रकरणांमध्ये कारवाई करून ३३ किलोचा हायड्रो गांजा जप्त केला. त्याची किंमत ३३ कोटी रुपये आहे. यापैकी एक प्रवासी मलेशियामधून, तर उर्वरित सहा प्रवासी थायलंडमधील बॅंकॉक येथून आले होेते. या प्रवाशांनी ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थ लपवून आणले होते. तपासणीदरम्यान विशेष उपकरणांचा वापर करून गांजा शोधण्यात आला. अटक करण्यात आलेल्या सर्व ८ जणांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींची पुढील चौकशी सुरू आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत स्थानिक पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी शाखेने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हायड्रो गांजाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
हायड्रो गांजा म्हणजे काय ?
हायड्रोपोनिक गांजा हायड्रो गांजा म्हणूूनही ओळखला जातो. म्हणजे मातीशिवाय वाढवली जाणारी गांजाची वनस्पती. या पद्धतीमुळे उत्पादकांना वनस्पतीवर अचूक नियंत्रण ठेवता येते. परिणामी, या वनस्पती लवकर वाढतात आणि उत्पादकांना जास्त उत्पादनही मिळते. हायड्रोपोनिक्स ही मातीशिवाय लागवड केली जणारी एक पद्धत आहे. या पद्धतीतील वनस्पती पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पाण्याच्या द्रावणात वाढवल्या जातात. बहुतांशी त्यात कोको कॉयर, परलाइट, चिकणमाती किंवा रॉकवूल असे पोषक घटकदेखील टाकले जातात. वातानुकूलित खोलीत एलईडी किंवा एचपीएस ग्रोथ लाईट्ससारख्या कृत्रिम दिव्यांचा वापर योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवून आणि नियमित पोषक घटक देऊन त्याची निर्मिती केली जाते.