मुंबई : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रवेश, परदेशात उच्च पदावरील नोकरी आणि त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत तडफदार कारकीर्दीची सुरूवात…असा अनेक आव्हानांनी भरलेला प्रवास करून आपले ध्येय गाठणारे प्रशासकीय अधिकारी मनुज जिंदल. त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी आणि करिअर संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत आज, रविवारी (२६मे) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर परदेशातील शिक्षण, विविध विद्याशाखांची माहिती, युट्यूब, समाज माध्यमे, वित्त आदी क्षेत्रांतील संधी, कौशल्य विकास, तणावाचे नियोजन या विषयांवरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाचे नियोजन, दिवसभरातील वेळेचे गणित कसे जुळवावे आणि शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य कसे जपावे आदी विविध गोष्टींबाबत आयएएस अधिकारी मनुज जिंदल विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच स्वत:चा प्रवासही मांडणार आहेत. मनुज जिंदल हे २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी भामरागड (जि. गडचिरोली) येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि परिविक्षाधीन अधिकारी (पीओ), जालना येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा >>>कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची तयारी हवीच- तेजस्वी सातपुते

हेही वाचा >>>कराड : विजेच्या तीव्र धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू, विहिरीच्या फ्युज बॉक्सजवळ आढळले मृतदेह

विविध विषयांवर आजही तज्ज्ञांचे मार्गदर्शन

– विद्यार्थीदशेतील ताणतणावाचे नियोजन आणि विद्यार्थी -पालकांतील मनमोकळा संवाद यावर डॉ. राजेंद्र बर्वे यांचे मार्गदर्शन

– सर्वच क्षेत्रांत स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत ‘यृूट्यूब – समाजमाध्यमे’ या विषयावर सुकीर्त गुमास्ते आणि वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी यांचे मार्गदर्शन.

– नवनवीन अभ्यासक्रम आणि विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख: विवेक वेलणकर

– कौशल्य विकास आणि त्यातील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे यांचे मार्गदर्शन.

– परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन संवाद साधतील.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

कधी ● आज (रविवार, २६ मे), सकाळी ९.३० वाजल्यापासून

कुठे ● दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा पश्चिम