कराड : विहिरीनजीक असलेल्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बाबरमाची-सदाशिवगड (ता. कराड) येथे घडली. फ्युज बॉक्समधील वायर उंदराने कुरतडल्याने हा विजेचा तीव्र धक्का बसला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (वय ५०) अशी विजेचा धक्का बसून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. या दोघांची गावातील भटकी नावाच्या शिवारात शेतजमीन आहे.

आणखी वाचा-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले १६ सस्तन प्राणी, ११ वन्य पक्षी, परिसपृ प्रजाती

आपल्या या शेतीनजीक स्वमालकीच्या विहिरीजवळ असलेल्या बॉक्समधून विहिरीला होणाऱ्या विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. शेतात काम असल्यामुळे तुकाराम व शहाजी खोचरे हे दोघेजण दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

अखेर सायंकाळच्या सुमारास तुकाराम खोचरेंचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी वडील व चुलते हे दोघेही विहिरीपासून काही अंतरावरील विद्युत बॉक्सनजीक मृतावस्थेत पडल्याचे त्याचे निदर्शनास आले. आणि या घटनेचा उलघडा झाला. रात्री कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.