एकेकाळी बदल्या आणि वेतनाबाबतच्या नाराजीबरोबरच खाजगी क्षेत्रात मिळणाऱ्या लक्षावधींच्या पॅकेजच्या मोहापोटी अनेक आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी सनदी नोकरीला रामराम ठोकला होता. आता परिस्थिती बदलली असून या सनदी बाबूंना आता खाकी वर्दी ऐवजी सफेद कुर्ता घालण्याचा मोह पडू लागला आहे. अर्थात यामागे ‘समाजसेवे’ची तीव्र आस असल्यामुळे ‘आप’च्या झाडूचा ध्यास, की कमळातील ‘लक्ष्मीदर्शना’ची आस, असा सवाल उपस्थित होताना दिसतो.
निवृत्तीनंतर राजकारणात जाणारे अनेक आयएएस व आयपीएस अधिकारी असले तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना राजीनाम देऊन थेट मोदीमय होऊन लोकसभेत जाण्याचे स्वप्न पाहाणारे सत्यपाल सिंह हे खऱ्या अर्थाने पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. सिंह यांच्या पाठोपाठ आणखीही दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असून सनदी अधिकाऱ्यांचा राजकारण प्रवेश ही राजकारण्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी गुंडांचा व उद्योगपतींचा उपयोग राजकारण्यांनी केल्यानंतर काही गुंड व उद्योगपतीच थेट राजकारणी बनून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात येऊन बसू लागले. ‘आप’ला मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर अरुण भाटियांसारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यापासून अनेकजण राजकीय रंगमंचावर प्रवेशासाठी इच्छुकांच्या रांगेत उभे राहिले. राजकारणातील ‘घी’ पाहिले, पण यातील अनेकांनी तेथील ‘बडगा’ पाहिलेला नाही. सत्यपाल सिंह यांनी राजीनामा देऊन उत्तर प्रदेशातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असतानाच त्यांना मुंबईत जाऊन निवडणूक लढविण्याचे सूचित करण्यात आल्यामुळे ते अस्वस्थ असल्याचे समजते.
ऐशीच्या दशकात मुंबईतील वरदराजन मुदलीयार गँगला संपविणारे वाय. सी. पवार यांनी निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी अद्यापि त्यांना विधिमंडळ अथवा संसदेत प्रवेश मिळालेला नाही. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत समील झालेल्या किरण बेदी आगामी काळात लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता असून युती शासनाच्या कालावधित तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यालयात सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांनीही सनदी सेवेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. यापूर्वी पोलीस सहआयुक्त टी. के. चौधरी हेही राजकारणाच्या मांडवाखालून जाऊन आले तर पोलीस उपायुक्त विक्रम बोके यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश करून ‘राज’कारण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. निवृत्तीनंतर एखादी पोस्ट पदरात पाडून लाल बत्तीची गाडी आणि घर पदरात पाडून घेण्यासाठी राजकारण्यांच्या मागेपुढे करणारे ‘बाबू’लोक आता थेट राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे स्वप्न पाहू लागले असून त्यांचाही ‘सत्यपाल’ होईल अशी भिती एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
सनदी ‘बाबूं’ना राजकारणाची स्वप्ने!
एकेकाळी बदल्या आणि वेतनाबाबतच्या नाराजीबरोबरच खाजगी क्षेत्रात मिळणाऱ्या लक्षावधींच्या पॅकेजच्या मोहापोटी अनेक आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी सनदी नोकरीला रामराम ठोकला होता.
First published on: 19-02-2014 at 04:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias officers political dream