हत्तीसाठी ‘आइस केक’ तर माकडांसाठी फळांची मेजवानी
उन्हाळ्याच्या झळा सुसह्य़ करण्यासाठी प्राण्यांकडेही नानाप्रकारच्या युक्ती असतात. मात्र बारा महिने पर्यटकांसाठी पिंजऱ्यात राहणाऱ्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना याबाबत मर्यादा येतात. या मर्यादा लक्षात घेऊन या वेळी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) प्राण्यांना खास उन्हाळी फळांचा मेवा दिला जात आहे.
केळी, चिकू, भोपळा, आंबा यांच्या गारेगार बर्फाच्या लादीपासून कलिंगड आणि शहाळ्याच्या पाण्यापर्यंत सर्वकाही प्राण्यांच्या दिमतीला ठेवले जाणार आहे. प्राण्यांचे स्वभाव व आहार यांची माहिती पर्यटकांनाही मिळावी यासाठी उन्हाळाभर दर शनिवार-रविवारी या मेजवानीचे आयोजन केले आहे.
मुंबईकरांप्रमाणेच राणीच्या बागेत पिंजराबंद असणाऱ्या प्राण्यांना वाढलेल्या उन्हाची झळ बसते आहे. हे प्राणी पिंजऱ्याच्या आवारातच फिरत असल्याने त्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध युक्त्यांचा अवलंब प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून केला जातो आहे. या दिवसांत संग्रहालयाच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात गुंतलेले आहेत. वाढत्या उन्हामुळे प्राण्यांच्या दैनंदिन आहारात बदल करण्यात आले आहेत. वैद्यकीय विभागातील अधिकारी आठवडय़ातून एकदा उन्हाळी फळांचा मेवा विविध मार्गानी प्राण्यांना खाऊ घालत आहेत. तसेच पक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी नारळ्याच्या झावळ्या, गवताचा वापर करण्यात येतो आहे.
प्राणिसंग्रहालयात असणाऱ्या दोन हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळ्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गारेगार अनुभव देणारा ‘आइस केक’ या प्राण्याला खाऊ घातला जात आहे. कलिंगड, पपई, केळी, चिकू, आंबा अशा फळांचे तुकडे करून त्यामध्ये गुळाचा पाक टाकला जातो. त्यानंतर हे मिश्रण गोठवून त्याचा ‘आइस केक’ बनविण्यात येतो. पाणघोडय़ांच्या आहारात भोपळ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच माकडांसाठी आंबे, भूईमुगाच्या शेंगा टाकल्या जात आहेत. किवी, ड्रॅगन फ्रुट, आंबा, कलिंगड यांच्या रसामध्ये मध टाकून त्यापासून ‘लॉलिपॉप’ बनवून माकडांना देण्यात येत आहेत. तर पक्ष्यांना शहाळी देण्यात आली आहेत. आंबा आणि भूईमुगाच्या शेंगा आंब्याच्या पेटीत दडवून माकडांच्या पिंजऱ्यात ठेवल्या जातात. त्यामुळे माकडदेखील या गोष्टी शोधण्याचा आनंद घेत त्या मटकावतात, असे प्राणिसंग्रहालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले. तसेच आठवडय़ाच्या शेवटी संग्रहालयात पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे आहार करण्याबाबतचे प्राण्यांचे स्वभाव पर्यटकांना माहिती करून देण्याच्या उद्देशाने शनिवार किंवा रविवारी पर्यटकांसमोर असे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे डॉ. राऊळ म्हणाल्या.
प्राण्यांच्या आहारामध्ये उन्हाळी मेव्याचा समावेश केल्याने त्यांनादेखील नेहमीच्या आहारापेक्षा वेगळे खाण्याची संधी मिळत आहे. – डॉ. कोमल राऊळ, वैद्यकीय अधिकारी, प्राणिसंग्रहालय
