मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘गुणात्मक घटक’ या संकल्पनेवर आधारित नवीन समभागसंलग्न (इक्विटी) योजना ‘क्वालिटी फंड’ प्रस्तुत केली आहे. ही नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) ६ मे ते २० मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुली आहे.

उच्च परतावा (आरओई), मजबूत रोख प्रवाह आणि चांगल्या भांडवल वाटपाचा इतिहास यासारखे मजबूत मूलभूत घटक असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे घटक, योग्य मूल्यांकन दृष्टिकोनासह एकत्रितपणे योजनेच्या समभाग निवड धोरणाचा कणा बनतील. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन म्हणाले, ‘आजच्या आर्थिक अनिश्चिततेच्या आणि मंद वाढीच्या वातावरणात, मजबूत आर्थिक स्थिती आणि शाश्वत नफा असलेले व्यवसाय ठळकपणे उठून दिसतात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल क्वालिटी फंडाचे उद्दिष्ट वाजवी मूल्यांवर उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या कंपन्यांची निवड करून या क्षमतेचा फायदा घेणे हे आहे.’

वाढत्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर केवळ दर्जेदार समभाग निवडच वादळी स्थितीचा सामना करण्यास सक्षम ठरेल. या कंपन्या त्यांचा मजबूत ताळेबंद आणि वाढीच्या कामगिरीमुळे अस्थिरतेच्या काळात चांगली कामगिरी करतात, अशी त्यांची धारणा आहे. पोर्टफोलिओ घडणीसाठी कडक गुणवत्ता आणि मूल्यांकन या आधारे अंदाजे ६२५ कंपन्यांची सूची सज्ज केली गेली असून, त्यापैकी ४०-६० समभागांचा फंडाच्या पोर्टफोलिओत समावेश केला जाईल.