शैलजा तिवले
प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने(आयसीएमआर) वैद्यकीय चाचण्याअंतर्गत देशातील २१ रुग्णालयांना परवानगी दिली असून यात राज्यातील सहा रुग्णालयांचा समावेश आहे.
रक्तद्रव उपचार ही प्रयोगशील उपचार पद्धती असून आयसीएमआरने याच्या वैद्यकीय चाचण्यांचा अभ्यास हाती घेतला आहे. या अभ्यासाला कोविड १९ राष्ट्रीय नॅशनल एथिक्स कमिटीने परवानगी दिलेली आहे. आयसीएमआरने वैद्कीय चाचण्या करण्यास नोंदणी प्रक्रिया सुरू केली. यात रुग्णालयांनी नोंदणी करण्याचे आवाहनही आयसीएमआरने केले होते.
करोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी रुग्णाच्या शरीरातून रक्त घेऊन त्यातील रक्तद्रव प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना देण्यात येईल. बरे झालेल्या रुग्णांनी जवळील केंद्रांमध्ये रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या वैद्यकीय चाचणीसाठीची नियमावलीही औषध नियंत्रक विभागाने जाहीर केली आहे.
ही उपचार पद्धती राबविण्यासाठी देशभरातील १२१ रुग्णालयांनी परवानगी मागितली आहे. यातील २१ रुग्णालयांना सध्या परवानगी दिली असून ९० रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.
देशातील २१ रुग्णालयांना आयसीएमआरने या चाचण्या करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बी.जे.मेडिकल(पुणे), पुना हॉस्पिटल अण्ड रिसर्च सेंटर(पुणे), एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन(मुंबई), छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(कोल्हापूर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(नागपूर) या सहा रुग्णालयांचा समावेश आहे.
