मुंबई : नाविन्यता तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’ म्हणजेच ‘आयआयसीटी’च्या पहिल्या संकुलाचे केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शुक्रवारी, १८ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. हे संकुल तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील पेडर रोडवरील ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’(एनएमआयसी) येथील एनएफडीसीच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. तर ‘आयआयसीटी’ची कायमस्वरूपी इमारत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर उभारण्यात येणार आहे. ‘आयआयसीटी’साठी केंद्र सरकारकडून ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एन्टरटेन्मेट समिट’ म्हणजेच ‘वेव्हज २०२५’ परिषदेच्या फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशनही यावेळी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या अहवालानुसार चार दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ३ हजार १०० हून अधिक कंपन्या आणि चित्रपट, तंत्रज्ञान, संगीत, गेमिंग, स्ट्रीमिंग आणि धोरण या क्षेत्रातील १ लाखांहून अधिक जण सहभागी झाले होते. तसेच, या परिषदेला समाजमाध्यमांवर ९१ दशलक्षांहून अधिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
तर महाराष्ट्र सरकारने ८ हजार कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार परिषदे दरम्यान केले. यामध्ये यॉर्क विद्यापीठाच्या मुंबईतील पहिल्या संकुलासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाबरोबर १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार, २०० एकर जागेवर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा करार, पनवेलमधील गोदरेज सिटी संकुलात चित्रपट, दूरचित्रवाणी आणि माध्यमक्षेत्राच्या विकासासाठी गोदरेजसोबतच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकल्पनेतून ‘वेव्हज’ परिषदेत उभारण्यात आलेले ‘भारत पॅव्हेलियन’ हे ‘वेव्हज’ परिषदेचा केंद्रबिंदू ठरले होते. या दालनातून भारताची संस्कृती अधोरेखित झाली होती. त्यामुळे ‘भारत पॅव्हेलियन’ ‘वेव्हज’ परिषदेपुरती मर्यदित न राहता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते. यानुसार एनएफडीसी-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) येथील गुलशन महल येथे उभारण्यात आलेल्या ‘भारत पॅव्हेलियन’चेही उद्घाटन करण्यात आले. ‘मुंबईच्या पर्यटन स्थळांमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’च्या रूपाने भर पडली आहे. तसेच, ‘वेव्हज’दरम्यान जाहीर करण्यात आलेला आणि सुरुवातीला ४२ कंपन्यांचा समावेश असलेला ‘वेव्हज’ निर्देशांक, ज्याचे एकत्रित मूल्यांकन अंदाजे ९३ हजार कोटी रुपये होते, त्याने अल्पावधीतच १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामधून सर्जनशील अर्थव्यवस्थेची जलद वाढ आणि अफाट क्षमता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘आयआयसीटी’ची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम कोणते?
सर्जनशील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांना नवीन कौशल्ये, प्रशिक्षण आणि साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयआयटी आणि आयआयएमच्या दर्जाची संस्था असावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयआयसीटी’ची संकल्पना मांडली होती. या अनुषंगाने ‘आयआयसीटी’ची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट २०२५ पासून सुरु करण्यात येणार आहे. या संस्थेद्वारा एव्हीजीसी-एक्सआर, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्स्टेंडेड रिॲलिटी आदी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.
पहिल्या तुकडीमध्ये ३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक व प्रशिक्षकांना प्रगत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष बाब म्हणजे ‘आयआयसीटी’ आणि उद्योगक्षेत्रातील नामांकित कंपन्यांशी सामंजस्याच्या उद्देशाने गुगल, मेटा, एनव्हीडिया, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲडोब, डब्ल्यूपीपीसारख्या विविध कंपन्यांसोबत औपचारिक भागीदारी करण्यात आली आहे. तसेच, चार विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरु असून यॉर्क विद्यापीठाशी करार आधीच झाला आहे. यावेळी बोलताना गोरेगाव चित्रनगरीत उभारण्यात येणारे ‘आयआयसीटी’चे कायमस्वरूपी संकुल सौंदर्यशास्त्रीय निकषांना अनुसरून आणि निसर्गरम्य वातावरणाशी सुसंगत असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारकडून ‘वेव्हज’ आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी १५० कोटी
‘वेव्हज’ परिषदेची जागतिक राजधानी ही मुंबईच असेल. भारत सरकारकडून ‘वेव्हज’ परिषद ही दरवर्षी किंवा दोन वर्षांच्या अंतराने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी ‘वेव्हज’ परिषद भारताची मनोरंजन राजधानी असलेल्या मुंबईतच आयोजित करण्यासाठी उत्सुक आहोत. हा भारताचा मनोरंजनक्षेत्राशी निगडीत जागतिक स्तरावरील भव्यदिव्य सोहळा असेल. ‘वेव्हज’ आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १५० कोटी रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी सामंजस्य करार
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, प्रसारभारती, ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेले मालाड (पश्चिम) येथील आकाशवाणी कार्यालय यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मालाड (पश्चिम) येथील आकाशवाणी कार्यालय यांच्या अखत्यारित असणाऱ्या १५० एकर जागेवर आगामी काळात प्रसारभारती, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट, मनोरंजन, माध्यम या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच, या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला जागतिक पातळीवरील निर्मिती जगतात (प्रॉडक्शन हब) स्थान प्राप्त करणे सुलभ होणार असून एकाच छताखाली माध्यम, प्रसारण आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करता येणार आहे.