मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT) काही विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ हे नाटक सादर करून प्रभू राम आणि सीतामातेच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घातले होते. या नाटकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत होती. त्याप्रमाणे आता आयआयटी मुंबईने या विद्यार्थ्यांवर तब्बल १.२ लाखांचा दंड ठोठावला आहे. संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रामायणावर आधारित असलेले हे नाटक सादर करण्यात आले होते. नाटकामधील आक्षेपार्ह संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रभू राम आणि हिंदू संस्कृतीचा हा अवमान असल्याचा आरोप करण्यात आला होता.

एकूण आठ विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले होते. त्यांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्काइतका दंड त्यांच्यावर लादण्यात आला आहे. यापैकी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२ लाख तर कनिष्ठ विद्यार्थ्यांना ४० हजारांचा दंड ठोठावला आहे. ज्येष्ठ विद्यार्थ्यांना त्यांच्या जिमखान्यातील पुरस्कारांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तर कनिष्ठ विद्यार्थ्यांना दंडासह त्यांची वसतिगृहाची सुविधा काढून घेण्यात आली आहे.

साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!

३१ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्यात आले होते. यामध्ये विविध विभागातील विविध वर्षांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नाटकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आयआयटी मुंबईतील या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली. राहोवन नाटकातील मुख्य पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्यामुळे नाराजी पसरली होती. सदर नाटक हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची चेष्ठा करणारे असल्याचा आरोपही केला गेला. यानंतर संस्थेने शिस्तपालन समितीची स्थापना करत विद्यार्थ्यांशी बैठक घेऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

गेले काही दिवस शिस्तपालन समितीने विचार करून आर्थिक दंड आणि इतर सुविधा काढून घेण्याचा निर्णय घेतला. नाटकावर अनेकांनी टीका केली असली तरी काही विद्यार्थ्यांनी या नाटकाला पाठिंबा दिला आहे. हे नाटक स्त्रीवादी असून आदिवासी समाजातील जाणीवांचा पुरस्कार करणारे आहे, असा युक्तीवाद समर्थकांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी मुंबईच्या प्रशासनाने या कारवाईवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.