मुंबई : आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टतर्फे २९व्या आवृत्तीसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळा मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मालिका २१ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान आयआयटी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
नवोन्मेष आणि प्रत्यक्ष अनुभव यांना चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील इच्छुकांना अत्याधुनिक साधने व उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. उद्योगातील अग्रगण्य तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक यांच्या सहकार्याने हे सत्र आयोजित केले जात असून, तांत्रिक शिक्षण आणि उद्योगातील प्रत्यक्ष गरजा यामधील दरी कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. टेकफेस्टमध्ये विविध कार्याशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे टेकफेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याबरोबरच प्रत्यक्ष प्रकल्प हाताळण्यासही मिळणार असल्याचे टेकफेस्ट आयोजकांकडून सांगण्यात आले. टेकफेस्टमध्ये होणाऱ्या कार्यशाळा या सर्वांसाठी खुल्या असल्या तरी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश मिळणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
टेकफेस्टमध्ये सहभागी हाेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईकडून व्यावसायिक प्रमाणपत्र, टेकफेस्टमधील सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश, एआय, मशीन लर्निंग, शेअर मार्केट, सायबर सिक्युरिटी, आयओटी आणि रोबोटिक्समध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. तसेच अॅमेझॉन, गुगल, बीएसई आणि इतर क्षेत्रातील उद्योग तज्ञांकडून मार्गदर्शनही मिळणार आहे. या कार्यक्रमासाठ विद्यार्थ्यांना techfest.org/workshops या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
टेकफेस्टमधील व्याखानांना विशेष सत्राने सुरुवात
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये विविध तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत. व्याख्यानाला एका विशेष सत्राने सुरुवात करण्यात येणार असून, त्यामध्ये इन्फोसिस लिमिटेड आणि कॅटमारन व्हेंचर्सचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत थिंक स्कूलचे सह-संस्थापक गणेशप्रसाद श्रीधरन संवाद साधणार आहेत. भारतातील आयटी क्षेत्रात क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसला जागतिक स्तरावर पोहोचवून भारताला सॉफ्टवेअर नवोन्मेषाच्या नकाशावर आणले आहे. तर गणेशप्रसाद यांनी थिंक स्कूलच्या माध्यमातून व्यवसाय, भू-राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांवर सुलभ आणि रोचक शिक्षणाची संधी उपलब्ध केली आहे.
