मुंबई : ‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ या विषयावरील कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर असल्याने ‘आयआयटी मुंबई’ने या कार्यक्रमातून माघार घेतली. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात होणाऱ्या या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये ‘आयआयटी मुंबई’चे नाव असल्याने समाजमाध्यमांत जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमातून माघार घेण्याचा निर्णय घेत समाजमाध्यमांवरील पत्रके काढून टाकण्यात आली.

बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-ॲमहर्स्ट या विद्यापीठाच्या सहकाऱ्याने तरुणांसाठी ‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बर्कले विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशिया स्टडीज येथे १२ सप्टेंबरपासून ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या. या प्रतिमांखाली ‘आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो’ असे उपशीर्षक होते. या पत्रकामध्ये ‘आयआयटी मुंबई’चे नाव आयोजकांमध्ये होते. हर्षिल मेहता यांनी हे पत्रक समाजमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे समाजमाध्यमांवर या पत्रकाचा व आयआयटी मुंबईचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. ‘आयआयटी मुंबई’सारखी संस्था अशा कार्यक्रमांमध्ये कशी सहभागी होऊ शकते, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. समाजमाध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेतल्याचे जाहीर केले.

‘आयआयटी मुंबई’चे परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण

ही कार्यशाळा ही आयआयटी मुंबईच्या ‘न्यू पॉलिटिकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह’च्या प्रकल्पाशी संबंधित होती. मात्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाबाबत आयोजकांकडून पूर्णपणे माहिती दिली नव्हती.

समाजमाध्यमावर पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ती संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर आयोजकांना सर्व समाजमाध्यमांवरून हे पत्रक काढून टाकण्याचे आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्व गोष्टींमधून आयआयटी मुंबईचे नाव काढून टाकण्याचे तात्काळ निर्देश दिले.

या कार्यक्रमाची माहिती ‘न्यू पॉलिटिकल इकॉनॉमी इनिशिएटिव्ह’च्या संकेतस्थळावरूनही तात्काळ काढण्यात आली आहे. आयआयटी मुंबईमधील कोणीही परिषदेला उपस्थित राहिलेले नाही. या पत्रकाबद्दल संस्थेशी आयोजकांकडून चर्चा करण्यात आली नव्हती. पत्रकातील मजकुरामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे यूसी बर्कले आणि मॅसॅच्युसेट्स-ॲमहर्स्ट विद्यापीठातील प्राध्यापकांशी आयआयटी मुंबईकडून कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल.

या कार्यशाळेच्या पत्रकाबाबत आयोजकांकडून पूर्णपणे माहिती दिली नव्हती. आयोजकांना सर्व समाजमाध्यमांवरून हे पत्रक काढून टाकण्याचे आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्व गोष्टींमधून आयआयटी मुंबईचे नाव काढून टाकण्याचे तात्काळ निर्देश दिले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल. – आयआयटी मुंबई</p>