वाढलेले नवनवीन अभ्यासक्रम, विद्यार्थीसंख्या आणि त्या तुलनेत अपुरी जागा यामुळे मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये गच्ची किंवा आजुबाजूच्या आवारात वर्गखोल्या, प्रयोगशाळा अथवा उपगृहाकरिता अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार वाढले आहेत.
मुंबईतील बहुतेक, खासकरून जुन्या महाविद्यालयांची रचना व उपलब्ध असलेली जागा कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपारिक अभ्यासक्रम चालविण्यापुरतीच मर्यादीत आहे. पण, बीएमएम, बीएमएस, बीएस्सी-आयटी आदी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम चालविण्यास परवानगी मिळाली तसा सर्वच महाविद्यालयांचा कारभार वाढू लागला आहे. अनुदानित अभ्यासक्रमांपेक्षा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम हे सध्याच्या घडीला महाविद्यालयांकरिता नफेखोरीचे प्रमुख साधन बनले आहे. वाढते अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्येमुळे अनेक महाविद्यालयांना जागा अपुरी पडू लागली आहे.
अंतर्गत बदल करून वर्ग
परिणामी अनेक महाविद्यालयांकडून गच्चीवर किंवा आवारात अतिरिक्त बांधकाम करून वा अंतर्गत रचनेत बदल करून वर्गखोल्या, प्रयोगशाळा वाढविल्या जात आहेत.
चर्चगेटच्या जयहिंद महाविद्यालयाविरोधात आलेल्या अशाच एका तक्रारीवरून पालिकेने तपासणी केली असता महाविद्यालयाने आवारात उपहारगृहासाठी बांधलेली शेड अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही शेड पाडण्यासाठी पालिका लवकरच संस्थेला नोटीस बजावणार आहे. याच महाविद्यालयाने गच्चीवर बांधलेले वर्गही अनधिकृत असल्याची ‘प्रहार विद्यार्थी संघटने’ची तक्रार आहे. याबाबत पालिकेचे सहाय्यक अभियंता ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता ‘या बांधकामाविरोधात संस्थेने सादर केलेला इमारतीचा बांधकाम आराखडा पालिकेच्या ‘इमारत प्रस्ताव समिती’कडून तपासण्यात आल्यानंतर या संबंधात पुढील कारवाई केली जाईल,’ असे सांगितले.
अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा
मात्र, संस्थेने बांधलेली शेड अनधिकृत असून ती पाडण्यासंदर्भात लवकरच नोटीस पाठवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संबंधात जयहिंदचे प्राचार्य डॉ. अशोक वाडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महाविद्यालयाच्या इमारतीत कोणतेही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा केला. ‘आत्ताची जागा अपुरी पडते आहे. त्यामुळे, महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्याचा विचार आहे. तसेच, गच्चीवरील बांधकामही फार जुने असून संबंधित यंत्रणांकडून परवानगी केल्यानंतरच त्यांचे बांधकाम केले आहे,’ असा दावा त्यांनी केला. जयहिंदप्रमाणे आम्ही हिंदुजा, माटुंग्याचे रूईया आदी महाविद्यालयांविरोधातही पालिकेकडे आणि विद्यापीठाकडेही तक्रार केली आहे. जयहिंदूबाबत कडक धोरण अनुसरणारी पालिका या महाविद्यालयांसंबंधातही कडक भूमिका घेणार का, असा सवाल संघटनेचे कार्यकर्ते अ‍ॅड. अजय तापकीर यांनी केला.

नगरविकास खात्याकडून पाहणी नाहीच
अनधिकृत बांधकामाचे प्रकार पुढे येऊ नये म्हणून मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीची पाहणी करून नगरविकास खात्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याबाबत दिलेल्या आदेशांनाही बहुतेक महाविद्यालयांनी केराची टोपली दाखविली आहे. मार्च, २०१२ पर्यंत हे प्रमाणपत्र विद्यापीठाकडे सादर करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. मात्र, माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार जानेवारी, २०१३ पर्यंत या परिपत्रकाला ६२२ पैकी केवळ २७ महाविद्यालयांनी प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झालेआहे. त्यापैकी २२ महाविद्यालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना असल्याचा दावा केला होता तर १२ महाविद्यालयांनी नगरविकास खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले होते. ही महाविद्यालये वगळता उर्वरित बहुतांश महाविद्यालयांनी तोपर्यंत विद्यापीठाच्या परिपत्रकाला साधा प्रतिसाद देण्याचीही तसदी घेतली नव्हती हे विशेष.

विद्यापीठाचीही डोळेझाक
 इमारतीमध्ये करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकाम व अंतर्गत बदलांमुळे अनेक अपघाताच्या घटना मुंबई शहरात घडल्या आहेत. त्यात अनेक निरपराध व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. महाविद्यालयांमध्येही जर हे प्रकार होत असतील तर तो हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे. त्यातून अनेक महाविद्यालयांच्या इमारती जुन्या आहेत. पण, दुर्दैवाने विद्यापीठ आणि पालिका प्रशासन या प्रकारांकडे डोळेझाक करते आहे.
अ‍ॅड. मनोज टेकाळे, अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना.

वेगळ्या पायाभूत सुविधा द्या
अनुदानित अभ्यासक्रम चालविण्यासाठी मिळालेल्या मर्यादीत जागेतच महाविद्यालये विनाअनुदानित अभ्यासक्रमांचा कारभार घुसडत आहेत. या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घेतात. त्यामुळे त्यासाठी पायाभूत सुविधाही स्वतंत्र असायला हव्या.
मधू परांजपे, सचिव, बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन