मुंबई : सरकारचा परवाना नसताना सावकारी व्यवसाय करून शेकडो शेतकऱ्यांच्या ७७१ हेक्टर जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या सावकारांवर विविध पोलीस ठाण्या फौजदारी कारवाई करण्यात आली असून ही जमीनही शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. तसेच सावकारांनी फसवणूक केल्याच्या तक्रारींवर आता जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करण्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
संजय देरकर, नाना पटोले, समीर कुणावर, अमित देशमुख, प्रशांत बंब, अभिजीत पाटील यांनी राज्यातील काही जिल्हयात होत असलेल्या अवैध सावकारीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान पाटील बोलत होते.राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची जमीन हडप केल्याच्या १० हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील सुमारे दोन हजार तक्रारींमध्ये तत्थ्य आढळून आले असून अशा प्रकरणांमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये ७७१ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात आली आहे. परवाना नसलेल्यांनी सावकारी करणे बेकायदेशीर असून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आले आहेत.
फक्त परवानाधारकांनीच कायदेशीर व्याजदर आकारून व्यवहार करावा. तसेच सावकारांनी व्याजदराची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावणे आवश्यक आहे आणि वार्षिक व्याज आकारणीचेही पालन केले पाहिजे. तक्रारदारांनी विशिष्ट सावकारांची व कर्जदारांची माहिती दिल्यास, संबंधितांना न्याय मिळवून देण्यात येईल तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई केली जाईल असेही पाटील यांनी सांगितले.
चंद्रपूर, पालघर आदी जिल्हयात अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींच्या अनुषंगाने विशेष पथकामार्फत संबंधित ठिकाणी धाडी टाकून झडती घेण्यात आली. तपासादरम्यान या तक्रारी सत्य आढळून आल्या असून, त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सीबीलची सक्ती करीत बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे जावे लागते. बोगस सावकार शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करतात. कर्ज देतानात त्यांच्याकडून जमीनीचे खरेदी खत करुन घेतात. कर्ज वसूलीसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवर अत्याचाराच्या धमक्या देतात. मराठवाड्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार यावेळी अनेक सदस्यांनी केली.