उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण; सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबी तपासण्याची गरज

मुंबई : फटाके हा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी तडकाफडकी दिली जाऊ शकत नाही, असे नवी मुंबईतील व्यावसायिकाची याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली गेली नाही, तर गंभीर दुर्घटना होऊ  शकते, असेही न्यायालयाने म्हटले.

दिवाळीसाठी फटाके विक्री करायची आहे. त्यामुळे दुकानाची रचना बदलण्याची परवानगी मागणारा अर्ज या व्यावसायिकाने केला होता. मात्र पालिकेने त्याची ही मागणी फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांचे दुकान ज्या ठिकाणी आहे, त्याच्या लगतची जागा सिडकोने लाकडाची बाजारपेठ म्हणून आरक्षित जाहीर केली

आहे. ही बाब लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने याचिकाकर्त्यांला दुकानाची रचना बदलण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे पालिकेने त्याचा अर्ज फेटाळताना स्पष्ट केले.

या निर्णयाविरोधात या व्यावसायिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठापुढे त्याच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सिडको-पालिकेच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. तसेच जमिनीच्या वापराबाबत पुनर्रचनेची मागणी करता येऊ  शकते. मात्र फटाक्यांच्या दुकानासाठी तातडीने परवानगी देता येणे शक्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याचिकाकर्त्यांने सिडकोकडे अर्ज करावा आणि सिडकोने परवानगी दिली तर पालिकेनेही परवानगी देण्याबाबत विचार करावा, असे आदेश न्यायालयाने दिले.