करोनाच्या चौथ्या लाटेचा फटका अवयवदानालाही बसला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये शहरातील अवयवदानाच्या प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. दरम्यान, मुंबईत ४६ वर्षांच्या महिलेने अवयवदान केल्याने तीन जणांना जीवनदान मिळाले.

राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मरणोत्तर अवयवदानाच्या प्रक्रियेला वेग आला होता. जानेवारीमध्ये पाच रुग्णांचे मरणोत्तर अवयवदान करण्यात आले होते. एप्रिलपर्यंत अवयवदानाची संख्या १६ वर पोहोचली. परंतु मेपासून करोनाची चौथी लाट सुरू झाली आणि अवयवदानाच्या प्रक्रियेचा वेगही कमी झाला. मेमध्ये दोन, तर जूनमध्ये एक मरणोत्तर अवयवदान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरारोड येथील ४६ वर्षीय महिलेचा मेंदूमृत झाल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिली. या महिलेचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत हे तीन अवयव १९ जुलैला दान करण्यात आले. जुलै महिन्यातील हे पहिलेच अवयवदान असून शहरात आतापर्यत २० जणांनी मरणोत्तर अवयवदान केले आहे. आतापर्यंत २० दात्यांनी ६९ अवयव दान केले आहेत. यामध्ये सर्वाधिक २४ मूत्रपिंडांचा समावेश आहे. त्याखालोखाल यकृत (१८), हृदय (१७), फुप्फुस (३), हात (४), स्वादुपिंड (१) आणि लहान आतडे (१) या अवयवांचा समावेश आहे.