मुंबई : सप्टेंबर- ऑक्टोबर या कालावधीत ला- निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, ही प्रणाली तटस्थ असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या दोन तीन आठवड्यांत सुरु होईल त्यामुळे ला निनाचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही.

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ प्रणाली सक्रिय झाली, असे म्हटले जाते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन आठवड्यांनी मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे ला निना स्थिती निर्माण झाली तरी त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मोसमी पावसाच्या कालावधीत ला निना स्थिती निर्माण झाली तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असते. याचबरोबर जर ही स्थिती हिवाळ्यात निर्माण झाली तर थंडीत वाढ होते. मात्र, ही स्थिती सप्टेंबर – ऑक्टोबर दरम्यान निर्माण होणार असल्याने तिचा परिणाम जास्त होणार नाही.

ढगाळ वातावरणाची शक्यता

ला निनामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हे कमी दाबाचे क्षेत्र मुख्यत्वे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनापट्टीलगत तयार होते. त्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार होते. ढगाळ वातावरणामुळे अनेकदा राज्यातील थंडी कमी होते, तर तापमानाचा पारा वाढतो. याचबरोबर ला निनामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबांची क्षेत्रे सातत्याने तयार होतात. त्यामुळे महाराष्ट्रावर बाष्पीयुक्त वारे येतात. राज्यात ढगाळ वातावरण तयार होते. त्यामुळे कधी कधी राज्यात हिवाळ्यात पाऊस पडताना दिसतो.

ला निनाचे अंदाज किती योग्य

याआधी भारतीय हवामान विभागासह जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेची हवामान संघटना यांनी गेल्या वर्षी जुलैअखेरपासून ‘ला निना’ सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जुलैअखेर पासून ऑक्टोबरपर्यंत ‘ला निना’ सक्रिय झाले नाही. आताही ‘ला निनासाठी’ पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापामान सरासरीपेक्षा किमान ५ अंश सेल्सिअसने कमी होण्याची गरज आहे. पण हवामान बदल, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ तसेच हवामान प्रणालींवर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत.

एल निनो आणि ला निनो

एल निनो ही स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या मद्य आणि आग्नेय भागातील तापमान वाढते. अल निनो त्याच्या तटस्थ अवस्थेत असताना वारे विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात आणि दक्षिण अमेरिकेतील उबदार पाणी आशिया खंडाच्या बाजूला घेऊन जातात. मात्र, एल निनो स्थितीवेळी वारे कमकुवत होतात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात.

या स्थितीत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना उबदार पाण्याचे प्रवाह मध्ये आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जाऊन पश्चिम अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात. हवामानाची स्थिती विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांनी विकसित होतो. ला निनाची स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ सक्रिय झाला, असे म्हटले जाते. ‘ला निना’मुळे प्रशांत महासागरात हवेची घनता वाढते, हवा दाट होते.