मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय) हे केवळ लोकांच्या वैयक्तिकच नव्हे, तर व्यावसायिक आयुष्यातही महत्वाची भूमिका बजावत आहे. व्यवसाय वाढीसाठी मजकूर निर्मिती करणे, सर्जनशील कल्पना, बोधचिन्ह तयार करणे, विपणन क्लृप्त्या, तसेच भाषांतरासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान हे परिपूर्ण नाही, परंतु तरीही दैनंदिन जीवनात त्याचा मोठा वापर होत आहे, असे मत मेटा इन इंडियाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांनी गुरुवारी व्यक्त केले. तसेच ‘इंस्टाग्रामʼ या समाजमाध्यमावरील २५ टक्के आशय हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन तयार केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
विविध स्त्रियांच्या नेतृत्वाखाली मेटा आणि द नज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रगतीʼ या स्टार्टअप उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. वांद्रे – कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी प्रगती संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी देवनाथन बोलत होत्या. गेल्या तीन ते चार वर्षात महिलांचा समाजमाध्यमांवरील सहभाग वाढला असून इंस्टाग्राम ॲपवर ७३ टक्के व्यवसाय महिला करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांमध्ये व्यवसाय करण्याची तसेच तो वाढवण्याची क्षमता निर्माण झाल्यास देशाला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या बळकटी मिळेल, असाही विश्वास देवनाथन यांनी संमेलनादरम्यान व्यक्त केला.
हेही वाचा – समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…
महिला उद्योजकता, कृषी तंत्रज्ञान, कौशल्य आधारित उद्योजकता आदी विविध क्षेत्रांमध्ये भांडवलाची मोठी गरज आहे. याची पूर्तता करण्यासाठी जनतेचा पैसा हा सर्वात उत्तम स्रोत आहे, असे मत द नज संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले. तसेच, दारिद्र्य निर्मूलनासाठी स्त्री उद्योजक समूहांचे सक्षमीकरण करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्यवसायात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, सक्षमीकरण, तसेच आरोग्य सेवेची उपलब्धता, महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांना निधी पुरवणे, देणगीदार मिळवून देणे, कायदेशीर सल्ला पुरविणे आदी विविध कामे प्रगती उपक्रमातून केली जातात. महिला उद्योजकांची आवश्यकता, त्यांच्या व्यवसायातील तंत्रज्ञानाचा वापर, व उद्योजकतेचे भवितव्य आदी विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. लाइटबॉक्सचे संदीप मूर्ती, फ्रेशमेन्यूच्या रश्मी डागा, माणदेशी बँकेच्या चेतना गाला सिन्हा, ब्रॅण्ड युनिलिव्हर आणि सस्टेनिबिलीटीचे प्रशांत व्यंकटेश, फ्रण्टियर मार्केट्सच्या अजैता शहा, स्टार्टअपच्या मनीषा गुप्ता, रिलायन्स फाउंडेशनच्या डॉ. वनिता शर्मा आदी मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले होते.
संमेलनात कॉर्पोरेट, सरकार, सामाजिक उद्योजकता आदी क्षेत्रांतील १२० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच यावेळी ‘साझे सपने’ आणि ‘कार्य’ या संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यात आली.