मुंबई: भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीने पुढील दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी चेंबूर परिसरात घडली. या अपघातात पुढील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून पुढील दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चेंबूरमधील छेडा नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात हनिफ शेख (४०) याचा मृत्यू झाला. हनिफ शीव येथून ठाण्याच्या दिशेने जात होता. छेडा नगर उड्डाणपूल परिसरातून जात असताना पाठीमागून आलेल्या एका दुचाकीने फनिफच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीचालक गंभीर जखमी झाले.
काही वाहन चालकांनी अपघाताची माहिती टिळकनगर पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच हनिफचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सोहेल खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.