मुंबई : खेकडे पकडण्यासाठी गेलल्या पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू झाला. कांदिवली पूर्व येथील हरिची बावडी येथील तलावात ही दुर्घटना घडली. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकनाथ पाटील (५०) हे कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगरमधील जय बजरंग चाळीत रहात होते. शनिवारी संध्याकाळी ते मुलगा वैष्णव पाटील (१२) याच्यासबोत कांदिवली पूर्व येथील बोईसर नाल्याजवळील हरिची बावडी तलावात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मुलगा वैष्णव खेकडे पकडत असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील एकनाथ तलावात उतरत होते. परंतु तेही तलावात पडले. त्यांना वाचविण्यासाठी आसपास कुणी नव्हते. त्यामुळे दोघेही तलावात बुडाले. या घटनेची माहिती वनरक्षकाने पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यातून पिता – पुत्रांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेकडे पकडत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये कुठलाही संशयास्पद प्रकार नाही, असे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी सांगितले. पावसाळ्यात तलाव आणि जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे अशा ठिकाणी जाण्याआधी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दहिसरमधील केतकीपाडा येथील एका दगडखाणीत साचलेल्या पाण्यात ३ जुलै रोजी बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.